डोंबिवली: शहरातील कपडे, पादत्राणे, पेढ्या आदी दुकाने चारनंतर पटापट बंद झाली. हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद झाले तरी त्याबाहेर चारनंतरही डोंबिवलीकरांची गर्दी दिसत होती. शटर वर करून वडापाव, भेळपुरी, शेव-बटाटापुरी आदी खाद्यपदार्थांची पाकिटे वितरित केली जात होती.
गेल्या आठवड्यात डोंबिवली शहर दुसऱ्या स्तरात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले. रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने, व्यवसायाला सुरुवात झाली होती. मात्र कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्याकरिता पुन्हा निर्बंध लागू झाले. त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
गेला आठवडाभर बाजारात जशी झुंबड उडाली होती, तशी ती सोमवारी बघायला मिळाली नाही. पूर्वेकडील चिमणी गल्लीतील मुख्य बाजारपेठ, पश्चिमेकडील गुप्ते पथ येथील विक्रेते यांनी मनपाचे नियम पाळून दुकाने बंद केली.
संध्याकाळी भाजी विक्रेते, फळ विक्रेते दिसून आले, मात्र फेरीवाले निदर्शनास आले नाहीत. रेल्वे प्रवासासाठी नियम कडक केल्याने रेल्वे प्रवाशांची संख्याही कमी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी रिक्षाचालकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात संध्याकाळी खासगी बसगाड्या येऊ नयेत, त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने त्या मानपाडा, घरडा येथे थांबवाव्यात, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे. मात्र तरीही मोठी वाहने इंदिरा गांधी चौकापर्यंत येत असल्याने या भागात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू होऊनही गर्दी झाली होती. डोंबिवलीकरांनी सायंकाळी खाद्यपदार्थांचे स्टॉल, हॉटेलबाहेर गर्दी केली व खाद्यपदार्थांची पार्सल खरेदी केली.
..................
वाचलीेे