डोंबिवलीत ‘समविषम’चा नियम धुडकावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:43 IST2020-06-06T00:43:29+5:302020-06-06T00:43:35+5:30
कल्याणमध्ये काही अंशी पालन : नागरिकांची खरेदीसाठी झुंबड, दुकानांसमोर मोठ्या रांगा

डोंबिवलीत ‘समविषम’चा नियम धुडकावला
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये शुक्रवारी प्रथमच विषम तारखेच्या निकषाप्रमाणे दुकाने उघडण्यात आली. कल्याणमध्ये काही अंशी हा नियम पाळण्यात आला. मात्र, डोंबिवलीत दोन्ही बाजूंकडील दुकाने उघडण्यात आल्याने नागरिकांनी तेथे खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या दुकानांवर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केडीएमसीने शुक्रवारपासून कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने समविषम तारखांनुसार उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात कंटेनमेंट झोनमधील काही दुकाने उघडल्याने त्यांना तशी मुभा कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित केला गेला. तर, दुसरीकडे कंटेनमेंट झोनबाहेरील विषम तारखेनुसार कपड्याची दुकाने, चप्पलविक्रेते, विद्युत उपकरणे विकणारी दुकाने तसेच पार्सल सेवा देण्यासाठी बडी उपाहारगृहे उघडण्यात आली. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानांची स्वच्छता गुरुवारी केल्याचे पाहायला मिळाले.
पावसाने आज उघडीप दिल्याने अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले. पावसाळी चपला, छत्र्या, रेनकोट, गळक्या घरांवर टाकण्यासाठी प्लास्टिक, ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केला होती. ताडपत्रीच्या दुकानात रांग लागली होती. दुसरीकडे काही दुकानदारांनी भीतीपोटी दुकानेच उघडली नाही. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पहिल्याच दिवशी उडाल्याने एक दिवसाआड दुकाने उघडावीत, जेणेकरून गर्दी होणार नाही, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी केली आहे. अन्यथा, पुण्याच्या धर्तीवर काही विशिष्ट वार ठरवून त्या-त्या वारीच दुकाने उघडण्याची वर्गवारी तयार करावी. त्यामुळेही गर्दी टाळली जाऊ शकते. याचा विचार प्रशासनाने करावा, असे त्यांनी सुचवले.
उपाहारगृहांमध्ये पार्सलसाठी गर्दी
डोंबिवलीत नियमाला बगल देत सरसकट सगळीच दुकाने उघडण्यात आली होती. तेथील उपाहारगृहांतील काउंटरवर पार्सल घेण्यासाठी गर्दी झाली. अनेक दिवसांनंतर इडलीचटणी, वडासांबार, मेदूवड्याचा आस्वाद अनेकांनी घेतला. दिलेल्या वेळेपलीकडेही काही दुकाने सुरू असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती.