वंशाच्या दिव्यासाठी पणती विझवू नका
By Admin | Updated: November 17, 2016 06:55 IST2016-11-17T06:55:59+5:302016-11-17T06:55:59+5:30
वंशाला दिवाच पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-बाबांनी पणती विझणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण पणतीमुळेच

वंशाच्या दिव्यासाठी पणती विझवू नका
चिकणघर : वंशाला दिवाच पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-बाबांनी पणती विझणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण पणतीमुळेच दिवा उजळण्याची वाट मोकळी होते. याची जाणीव ठेऊन जन्माला येणाऱ्या मुलीला जगू द्या, तिला मोकळा श्वास घेऊ द्या, अशी साद कीर्तनकार हभप विनता पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला घातली.
गौरीपाडा येथे कार्तिक स्नाननिमित्त झालेल्या हरिनाम कीर्तन सोहळा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कल्याण परिसरातील वारकरी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलांवर संस्कार करण्याचे आई-बाबांचे केवळ कर्तव्यच नाही तर जबाबदारीही आहे. सध्याच्या जागतिकीकरणामुळे मानवी जीवन वेगवान झाले आहे. याचा परिणाम संस्कार बिघडण्यात झाला आहे, असे सांगून चाकरमानी महिला मुलांच्या संगोपनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. सहा महिन्यांच्या अपत्याला त्यांना पाळणा घरात ठेवावे लागत आहे. यामुळे अशा मुलांना आईच्या मायेची ऊब मिळत नाही. त्यातच टीव्हीसारख्या यंत्राने घराघरात वेड लावल्यामुळे संस्कार आणि संस्कृती या दोन्हीवर परिणाम होत आहे. म्हणून मुलगा असो वा मुलगी भेदभाव न करता ते अज्ञानातून सज्ञानात प्रवेश करीपर्यंत आईबाबांनी आपल्या मुलांवर स्वत: संस्कार करण्यावर भर देण्याची गरज असते, असा प्रबोधनात्मक सल्ला पाटील यांनी कीर्तनातून दिला.
कोजागिरी ते कार्तिक त्रिपुरा पौर्णिमा, असा महिनाभर हा कार्यक्रम सुरू होता. (वार्ताहर)