शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजकारण आणू नका : विश्वनाथ पाटील
By Admin | Updated: October 1, 2015 23:26 IST2015-10-01T23:26:53+5:302015-10-01T23:26:53+5:30
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजकारण आणू नका : विश्वनाथ पाटील
वाडा : कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात कुणीही राजकारण आणू नये, असे प्रतिपादन कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वाडा येथे शेतकऱ्यांच्या सभेत केले.३५ सेक्शन, इको-सेन्सेटिव्ह झोन, विविध प्रकल्पांसाठी तसेच महामार्गासाठी संपादित होत असलेली जमीन अशा विविध समस्यांमध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यांतील हजारो शेतकरी अडकले आहेत. या बाधित शेतकऱ्यांची सभा वाडा येथे वाडा तालुका शेतकरी संघटना व कुणबी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी मुरबाडमध्ये माजी आमदार दिगंबर विशे, गोटीराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कुणबी समाजाचे शेतकरी उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कर्जमुक्तीच्या मागणीबरोबरच विविध समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढण्याची तयारी करावी, असे आवाहन विश्वनाथ पाटील यांनी या वेळी केले.
ठाणे, पालघर जिल्ह्यांतील ४४ हजार शेतकऱ्यांच्या ६७ हजार हेक्टर शेतजमिनीवर वन खात्याने बेकायदेशीर वनसंज्ञा लावून येथील शेतकऱ्यांना नाहक अडचणीत आणल्याचा आरोप माजी आमदार दिगंबर विशे यांनी या वेळी केला. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे संबंधित मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे, न्यायालयीन लढाई व जनआंदोलन उभारणे, अशा तीन प्रकारची लढाई लढली जाईल, असेही ते म्हणाले.
ही सभा यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, उपाध्यक्ष परशुराम सावंत, हरिश्चंद्र पाटील, रंजन पाटील व कुणबी सेवा संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले होते.