भिवंडीत कामगारांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: November 9, 2015 02:42 IST2015-11-09T02:42:32+5:302015-11-09T02:42:32+5:30
शहरात व परिसरातील उद्योग, व्यावसायिकांनी बोनस व किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी न केल्याने कामगारांची दिवाळी अंधारात जाणार आहे

भिवंडीत कामगारांची दिवाळी अंधारात
भिवंडी : शहरात व परिसरातील उद्योग, व्यावसायिकांनी बोनस व किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी न केल्याने कामगारांची दिवाळी अंधारात जाणार आहे. तर, ऐन दिवाळीदरम्यान यंत्रमाग कामगार काही ठिकाणी बंड करणार असल्याचे वृत्त आहे.
देशातील यंत्रमागांपैकी अर्धे यंत्रमाग भिवंडीत आहेत. यंत्रमाग आणि कापड उद्योगाचा डोलारा सातत्याने वाढत असताना शहरातील सुमारे साडेतीन लाख कामगारांकडे व्यापाऱ्यांसह शासनाचे दुर्लक्ष आहे. स्थानिक कामगार संघटना मोर्चे-आंदोलने करून आपल्या मागण्या शासनाकडे मांडूनही त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. ग्रामीण परिसरातील गोदामांमध्ये लाखो कामगार काम करीत असताना काही कंपन्यांची गोदामेवगळता इतर गोदामांतील असंघटित कामगारांना बोनस अथवा हक्काची रजा मिळत नसल्याने त्यांची दिवाळी केवळ मिठाईच्या पुड्यावर भागविली जाणार आहे. तसेच शहरातील शेकडो प्लॅस्टिकच्या मोती कारखान्यांत काम करणारे सुमारे २५ हजार कामगार कायदेशीर सुविधांपासून वंचित असल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. कापड उद्योगातील अस्थिरता दाखवून मालकवर्ग नेहमी कामगारांना वेठीस धरतो. मात्र, या वर्षी यंत्रमाग कामगार ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करून मालकांस वेठीस धरणार असल्याची माहिती कामगार संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)