जि.प.च्या प्रशासन अधिकाऱ्यास अटक
By Admin | Updated: June 29, 2017 02:52 IST2017-06-29T02:52:02+5:302017-06-29T02:52:02+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रशासन अधिकाऱ्यास सहकारी अधिकाऱ्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

जि.प.च्या प्रशासन अधिकाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रशासन अधिकाऱ्यास सहकारी अधिकाऱ्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बदलापूर येथून बदल झालेले औषध निर्माण अधिकारी हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार याने त्यांच्याकडे ठाण्यासह बदलापूरचाही अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. हा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यासाठी आणि यापूर्वी केलेल्या काही कामांच्या मोबदल्यात डॉ. चिद्दरवारने तक्रारदारास ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने यासंदर्भात ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या वेळी डॉ. चिद्दरवारला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण सावंत करीत आहेत.