वर्षभरात अडीच हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण
By Admin | Updated: May 9, 2017 00:58 IST2017-05-09T00:58:01+5:302017-05-09T00:58:01+5:30
शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत असून दरमहिन्याला ४०० जणांना चावत असल्याची नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहे.

वर्षभरात अडीच हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत असून दरमहिन्याला ४०० जणांना चावत असल्याची नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहे. यामुळे महापालिकेने कुत्रे निर्बीजीकरणाचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे वर्षभरात २ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. अडीच हजारांचे त्यांचे टार्गेट असून सलग दुसऱ्या वर्षी निर्बीजीकरणाचा ठेका देण्याचे संकेत वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिले.
शहरात कुत्र्यांची संख्या १५ हजारांपेक्षा अधिक आहे. कुत्र्याच्या दहशतीने नागरिक रात्री १० नंतर घराबाहेर पडण्यासही घाबरतात. २०१२ च्या पशुगणनेनुसार कुत्र्यांची संख्या ३६३८ असल्याचे पालिका सांगते. प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा कुत्र्यांची संख्या बरीच जास्त आहे. उघड्यावरील कचराकुंड्या हे कुत्र्यांचे मुख्य ठिकाण आहे. पालिकेने १० वर्षांनी श्वान निर्बीजीकरणाची योजना राबवली. मध्यंतरी श्वान निर्बीजीकरण निविदेला ठेकेदार मिळाला नसल्याने कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत होती. मात्र, ठेकेदार मिळत नसल्याने निर्बीजीकरणाची प्रक्रिया ठप्प पडली. अखेर, निविदेतील अटीशर्ती कमी करून श्वान निर्बीजीकरणाचा ठेका गेल्या एप्रिल महिन्यात दिला.
महापालिकेकडे स्वत:चे पशू रुग्णालय व पशू वैद्यकीय अधिकारी तसेच कुत्रे पकडणारे पथक नसल्याने कुत्र्यांना आळा घालण्यासाठी व नसबंदीसाठी खाजगी ठेकेदारावर अवलंबून राहावे लागत आहे. पालिका एका कुत्र्याच्या नसबंदीवर ८६० रुपये खर्च करणार पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात २५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ३० लाखांची तरतूद केली आहे.