मतदारयादीतील चुकांमुळे शहरातील नवमतदारांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:07 AM2019-04-28T01:07:28+5:302019-04-28T01:07:43+5:30

मतदारनोंदणी व मतदारयादी तयार करण्याच्या कामात प्रशासनाचा भोंगळ कारभार नवीन नसला, तरी प्रशासनाच्या गलथानपणामुळे नवमतदारांमध्ये मात्र नाराजी आहे.

Disgruntled among the newly elected voters in the electoral rolls of the city | मतदारयादीतील चुकांमुळे शहरातील नवमतदारांमध्ये नाराजी

मतदारयादीतील चुकांमुळे शहरातील नवमतदारांमध्ये नाराजी

Next

मीरा रोड/भाईंदर : मतदारनोंदणी व मतदारयादी तयार करण्याच्या कामात प्रशासनाचा भोंगळ कारभार नवीन नसला, तरी प्रशासनाच्या गलथानपणामुळे नवमतदारांमध्ये मात्र नाराजी आहे. या नवमतदारांनासुद्धा राहतात एका इमारतीत, तर नाव भलतीकडेच आल्याचे अनुभव मोठ्या प्रमाणात आले आहेत. यावरून घरोघरी पाहणी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गोंधळामुळे मतदान कमी होण्याची शक्यता आहे.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भाईंदर पूर्वेच्या नवघरमार्गावरील शिवछाया इमारतीत संतोष सहदेव निकम हा २० वर्षांचा तरुण राहतो. गेल्या महिन्यात त्याने मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरला होता. अर्जासोबत आवश्यक पुरावे जोडले होते. त्याचे नाव मतदारयादीत नोंदवले; पण राहत्या इमारतीऐवजी एव्हरेस्ट हिल इमारतीत त्याचे नाव आले आहे. मतदारयादीत त्याचे नाव आल्याची त्याला माहितीसुद्धा नव्हती. त्या भागात अनेक वर्षे राहणारे प्रकाश नागणे यांनी त्याला यादीत नाव आल्याची माहिती दिली. स्वत: नागणे यांच्या मुलीच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. नागणे हे अन्नपूर्णानगरमध्ये राहतात. त्यांची मुलगी प्राची ही नवमतदार असून, तिचे नाव यादीत आले असले, तरी पत्ता मात्र कामधेनू इमारतीचा आहे. याच भागातील मनीष इमारतीतील मतदार म्हणून यादीत असलेली तब्बल ४० ते ४५ नावे ही त्या इमारतीत राहणाºया रहिवाशांचीच नाहीत. अशा प्रकारे बोगस मतदानाची तर ही तयारी नाही ना, असा संशयसुद्धा व्यक्त केला जातो.

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमध्येही तेच प्रकार आहेत. भाईंदर पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर असलेल्या आदित्य शेल्डन इमारतीत प्रथमेश नंदकिशोर बडगुजर या १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याने फेब्रुवारी महिन्यात आपले नाव मतदारयादीत यावे, म्हणून सर्व पुरावे जोडून अर्ज भरला होता. हिंदुजा महाविद्यालयात शिकत असलेल्या प्रथमेशचे नाव मतदारयादीत नोंदवले गेले. तो राहतो, त्या इमारतीचे नाव, पत्ता यादीत असून मतदार ओळखपत्रसुद्धा मिळाले आहे. परंतु, प्रथमेश ज्या ठिकाणी राहतो, त्याचा यादी भाग क्र. १६० आहे. पण, मतदारयादीत नाव आले आहे, ते यादी भाग क्र. २०७ मध्ये. सदर यादी भाग क्र. २०७ चा परिसर हा त्याच्या घरापासून कुठल्याकुठे लांब असलेल्या मॅक्सस मॉलसमोरील डी-मार्टच्या परिसरातला आहे.

प्रथमेशचा मोठा भाऊ धीरजच्या बाबतीतसुद्धा असाच प्रकार घडलाय. तो राहतो, त्या इमारतीत नाव येण्याऐवजी राम मंदिर मार्गावरील ओम रिद्धी इमारतीत त्याचे नाव आले आहे. असे अनेक प्रकार नवतरुण मतदारांबाबतीत घडल्याने मतदानाच्या उत्साहासोबतच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी आणि मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यातच ज्या इमारतीत राहत नसताना, नावे आली आहेत, तेथील नावे कमी होण्याची भीती त्यांना आहे.

मतदान करा, असे शासन आणि नेते सतत सांगत असतात. मलासुद्धा मतदान करण्याचा खूपच उत्साह होता. पण, मतदारनोंदणीसाठी अर्ज भरण्यासाठीचा अनुभव चांगला नाही. आता नाव मतदारयादीत आले; पण मतदान भलत्याच ठिकाणी आले. सर्व पुरावे देऊनसुद्धा असा प्रकार होत असेल, तर नाराजी येणारच.
- प्रथमेश बडगुजर, नवमतदार

मतदारयादीत अर्ज भरला होता. पण, यादीत नाव आल्याची माहितीच नव्हती. पण, नाव आल्याचे कळले तेव्हा आनंद झाला. मतदार म्हणून आपण जबाबदार नागरिक झालो, असे वाटले. आता कळले की, मतदारयादीत मी राहतो, त्या इमारतीचा पत्ताच नाही. असे व्हायला नको होते.
- संतोष निकम, नवमतदार

देशाचे भविष्य मतदार निवडतो, असं म्हणतात; पण मतदारांचे पत्तेच असे चुकीचे टाकले जात असतील, तर यंत्रणा काम तरी काय करते? नवमतदारांना सुरुवातीलाच असे वाईट अनुभव येत असतील, तर व्यवस्थेवर भरवसा तरी कसा राहणार?
-प्राची नागणे, नवमतदार

Web Title: Disgruntled among the newly elected voters in the electoral rolls of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.