जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच नाही!

By Admin | Updated: May 28, 2016 02:49 IST2016-05-28T02:49:03+5:302016-05-28T02:49:03+5:30

डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोण, अशी विचारणा होत होती. मात्र, मागील आठ महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांनी

Disaster Management Officer is not the district! | जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच नाही!

जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच नाही!

- पंकज रोडेकर, ठाणे

डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोण, अशी विचारणा होत होती. मात्र, मागील आठ महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कायमस्वरूपी जिल्हा आपत्ती अधिकारी मिळत नसल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान,एकाची नियुक्ती केली होती. मात्र, त्या अधिकाऱ्याने १० दिवसांतच राजीनामा दिल्याने पुन्हा हे पद रिक्त आहे. पावसाळा तोंडावर आल्याने ते भरावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
जिल्ह्यात तसेच आसपासच्या शहरांत पावसाळ्यात उद्भवलेल्या आपत्ती निवारणासाठी जिल्हा आपत्ती कक्षाची स्थापना केली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिका क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात अनेक इमारती जुन्या असल्याने त्या धोकादायक तसेच अतिधोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याची शक्यता अधिकच असते. या दुर्घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे तसेच जिल्ह्यातील कंपन्यांमध्येदेखील एखादी अनुचित घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व तेथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागासह त्यांच्या प्रमुखाचे असते.
२०१५ च्या आॅगस्ट महिन्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कक्षप्रमुख डॉ. जयदीप विसावे यांनी वैयक्तिक कारण देऊन राजीनामा दिला. त्यानंतर, जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबवली गेली. मात्र, तिला योग्य तो प्रतिसाद मिळाला नव्हता. याचदरम्यान, मीरा-भार्इंदरचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना या पदाची तात्पुरत्या स्वरूपात जबाबदारी दिली. त्यानंतर, पुन्हा भरती प्रक्रि या राबवल्यावर त्याला चांगला प्रतिसाद लाभल्याने जिल्हा आपत्ती कक्ष अधिकारीपदी सांगलीचे मोहन भोरे यांची नियुक्ती झाली.
मात्र, त्यांनीदेखील कौटुंबिक कारणामुळे १० दिवसांतच राजीनामा दिल्यानंतर भरती प्रक्रि येनुसार निवड झालेल्या १० पैकी दोन नंबरच्या साताऱ्यातील उमेदवाराची निवड केली. त्यांनी काही दिवसांतच या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नियमानुसार निवड केलेल्या १० उमेदवारांपैकी तीन नंबरवर असलेल्या उमेदवाराच्या शिफारशीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी विशेष बाब म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील कार्यालय अधीक्षक पद्माकर दळवी यांच्याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचे पत्रक एप्रिल महिन्यात काढले. मात्र, त्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

Web Title: Disaster Management Officer is not the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.