कोरोना निर्बंधाबाबत केडीएमसी प्रशासनाचा दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:00+5:302021-04-03T04:37:00+5:30

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे दिवसाला ९०० रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी मनपाने सर्व दुकाने ...

Disadvantages of KDMC administration regarding corona restriction | कोरोना निर्बंधाबाबत केडीएमसी प्रशासनाचा दुजाभाव

कोरोना निर्बंधाबाबत केडीएमसी प्रशासनाचा दुजाभाव

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे दिवसाला ९०० रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी मनपाने सर्व दुकाने व आस्थापने शनिवार, रविवारी बंद ठेवण्याचा आदेश काढला होता; मात्र व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी हा आदेश मागे घेतला. परंतु, हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांना या दोन दिवशी व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी कायम ठेवला आहे. आयुक्तांच्या या आदेशातून प्रशासन फेरीवाल्यांसोबत दुजाभाव करीत असून कोरोना केवळ फेरीवालेच पसरवित आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

भाजीपाला व फेरीवाला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष व केडीएमसीच्या फेरीवाला समितीचे सदस्य प्रशांत माळी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयुक्तांनी सर्व दुकाने, आस्थापना शनिवार आणि रविवारी बंद करण्याचा निर्णय होळीच्या अगोदर घेतला होता. दुकानदारांनी शनिवारचा बंद पाळला. मात्र, होळीला सूट देण्याचा आग्रह धरला. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. त्यावेळी एक दिवसाची सूट देत शनिवारी, रविवारी सर्व दुकाने बंदच राहतील, या मुद्यावर आयुक्त ठाम होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने आदेश काढून सर्व दुकाने शनिवारी, रविवारी सुरू राहतील, असे आदेश काढले. मात्र फेरीवाल्यांना रविवारी आणि सोमवारी बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे दुकानदारांना सूट आणि फेरावाल्यांवर निर्बंध लादणे योग्य आहे का, तसेच फेरीवाल्यांमुळे कोरोना पसरतो का असा संतप्त सवाल फेरीवाल्यांनी केला आहे.

‘मग आमच्या पोटावर पाय का?’

- फेरीवाल्यांचे पोट हातावरचे आहे. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू केल्याने फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यातून आता कुठे ते सावरत असताना त्यांच्यावर निर्बंध घालणे म्हणजे फेरीवाल्यांवर प्रशासनाचा अन्याय आहे.

- रेस्टाॅरंट, हॉटेल, बार यांना जास्तीची वेळ दिली आहे. दारूची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा आहे. मात्र, आम्हाला पोट भरू दिले जात नाही, याकडे फेरीवाल्यांनी लक्ष वेधले आहे.

- कल्याण-डोंबिवलीत १० हजारांपेक्षा जास्त फेरीवाले असून, त्यांच्यावरील निर्बंध हटवावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून फेरीवाले धंदा करण्यास तयार आहेत. या मागणीचा विचार प्रशासनाने न केल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे.

--------------------

Web Title: Disadvantages of KDMC administration regarding corona restriction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.