भावाच्या न्यायासाठी अपंगाची धडपड

By Admin | Updated: February 10, 2017 04:03 IST2017-02-10T04:03:53+5:302017-02-10T04:03:53+5:30

गार मागितल्याने औरंगाबादमधील एका तरुणाला सोमवारी रात्री बेदम मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने खासगी

Disability struggle for brother's decision | भावाच्या न्यायासाठी अपंगाची धडपड

भावाच्या न्यायासाठी अपंगाची धडपड

कल्याण : पगार मागितल्याने औरंगाबादमधील एका तरुणाला सोमवारी रात्री बेदम मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने खासगी वाहन पकडून कल्याण गाठले. या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी त्याचा अपंग भाऊ महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत आहे. परंतु, ती दाखल करण्यास टाळाटाळ करून पोलिसांनी त्याला औरंगाबादला जाण्यास सांगितले. त्यामुळे त्याने पत्रकारांशी संपर्क साधताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
प्रकाश पाटील (३४, रा. औरंगाबाद) हे एका खाजगी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्समध्ये चालक आहेत. त्यांनी मालकाकडे आपला पगार मागितला. मात्र, पगार न देताच त्यांना अन्य एका चालकाने सोमवारी रात्री औरंगाबाद-बीडफाटा येथे बेदम मारहाण केली. तसेच मालकाकडून पगार मिळणार नाही, असा दम दिला. जखमी अवस्थेतील पाटील यांनी घरी जाण्यासाठी एक खाजगी बस पकडली. मात्र, आपण कुठे चाललो आहेत, हे त्यांना कळलेच नाही. बसमध्येही ते बराच वेळ बेशुद्धीत असल्याने वाहकाने त्यांना तिकीट विचारले नाही. मंगळवारी सकाळी ते भिवंडी बायपास येथे उतरले. पण, आपल्याला कुठे जायचे, कुठे आलो आहोत, हे त्यांना काहीच समजत नव्हते. त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर येताच त्यांनी ही बाब फोनद्वारे सुरत येथे कामाला असलेले भाऊ फकिरा पाटील यांना कळवली. त्यांनी थेट कल्याणला धाव घेतली. फकिरा हे दोन्ही पायांनी अपंग आहेत. भावाला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी रुग्णालयात प्रकाश यांचे म्हणणे जाणून घेतले. मात्र, तक्रार घेण्यास नकार दिला. गुन्हा दाखल व्हावा, यासाठी फकिरा दोन दिवस पोलीस ठाण्यात चकरा मारत होते. मात्र, पोलीस त्यांना दाद देत नव्हते. त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, प्रकाश यांंना सीटी स्कॅनसाठी शीव रुग्णालयात हलवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Disability struggle for brother's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.