मुजोर व्यापारी, मठ्ठ प्रशासनामुळे ‘डर्टी पिक्चर’
By Admin | Updated: March 24, 2017 01:11 IST2017-03-24T01:11:18+5:302017-03-24T01:11:18+5:30
लोकानुनयी धोरणे घेत करवाढ व करवसुलीत नगरसेवकांचा वरचेवर सुरू असणारा हस्तक्षेप, भरमसाट नफा कमवूनही महापालिकेचे

मुजोर व्यापारी, मठ्ठ प्रशासनामुळे ‘डर्टी पिक्चर’
ठाणे : लोकानुनयी धोरणे घेत करवाढ व करवसुलीत नगरसेवकांचा वरचेवर सुरू असणारा हस्तक्षेप, भरमसाट नफा कमवूनही महापालिकेचे कर भरण्यास खळखळ करणारे मुजोर व्यापारी आणि करवसुलीची असाध्य लक्ष्ये निश्चित करून वसुलीसाठी ‘कचरा फेको’ सारखे आचरट प्रयोग राबवणारे मठ्ठ प्रशासन, अशा गदारोळामुळे स्मार्ट ठाणेकर होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना गुरुवारी शहरातील प्रमुख बाजारपेठेत कचऱ्याची डर्टी पिक्चर्स दिसली.
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने करवसुलीकरिता ‘कचरा फेको’ आंदोलनाचा आचरट प्रयोग सर्वप्रथम केला व मुखभंग करून घेतला. त्यातून धडा घेण्याऐवजी ठाणे महापालिका प्रशासनाने त्याचीच री ओढत ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर कचरा टाकून स्वत:ची शोभा करून घेतली. करवसुली हे जसे महापालिकेचे कर्तव्य आहे तसेच शहर स्वच्छ ठेवणे, हेही महापालिका प्रशासनाचेच कर्तव्य आहे. करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर कधी बॅण्डबाजा वाजव किंवा तृतीयपंथी नाचव, असे प्रयोग करण्याच्या साहसवादापोटी प्रशासनाकडून ही कर्तव्यच्युती घडल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे.
व्यापारी त्यांच्या महागड्या शोरूमचे लक्षावधी रुपयांचे भाडे भरतात. तशी त्यांची दुकाने वर्षानुवर्षे सुरू आहेत, म्हणजेच त्यांना रग्गड नफा कमवणे शक्य होत आहे. असे असताना स्वत: केलेला कचरा उचलण्याकरिता कर भरण्यास विरोध करणे, ही व्यापाऱ्यांची मुजोरी आहे. पालिकेने या व्यापाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई करून त्यांना तुरुंगाची हवा खायला लावायला हवी होती. मात्र, तसे न करता त्यांच्या दुकानांसमोर कचरा टाकल्याने विनाकारण त्यांना बोंब मारण्याची संधी दिली. यात नगरसेवक सर्वात दोषी असल्याचे ठाणेकरांचे मत आहे. वेळोवेळी थोडी करवाढ करून विश्वस्त या नात्याने पालिकेची आर्थिक काळजी न वाहता लोकानुनयी भूमिका घेत करवाढीला विरोध करण्याच्या धोरणांमुळे महापालिका अडचणीत सापडल्या आहेत. (प्रतिनिधी)