धूर फवारणीतले डिझेलच गायब
By Admin | Updated: December 18, 2014 01:17 IST2014-12-18T01:17:46+5:302014-12-18T01:17:46+5:30
एकीकडे साथीच्या रोगाबरोबरीने डेंग्यू-मलेरियासारखे गंभीर आजार डोके वर काढत असताना त्यांंच्यावर मात करणा-या फवारणीतील डिझेलच गायब

धूर फवारणीतले डिझेलच गायब
मनीषा म्हात्रे, मुंबई
एकीकडे साथीच्या रोगाबरोबरीने डेंग्यू-मलेरियासारखे गंभीर आजार डोके वर काढत असताना त्यांंच्यावर मात करणाऱ्या फवारणीतील डिझेलच गायब झाल्याचा आरोप झाला असून याची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे डिझेलच गायब झाल्याने फवारणी रोखल्याने पालिका प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर येत आहे.
स्थानिक नगरसेवक रूपेश वायंगणकर यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत हा आरोप केला आहे. प्रशासनाच्या नियमावलीनुसार, प्रत्येक वॉर्डनिहाय फवारणी मशिनसाठी प्रतिदिन २४ लीटर डिझेल पुरविणे गरजेचे आहे. एका मशिनमधून सहा वेळा फिलिंग करावे लागते.
२४ लीटरऐवजी दिवसाला १० ते १३ लीटर डिझेल पुरविण्यात येत असल्याचा आरोप वायंगणकर यांनी केला. भांडुप एस विभागात १३ नगरसेवक आहेत. अशात वर्षाकाठी प्रत्येक नगरसेवकामागे ८ हजार ७६० लीटर डिझेल पुरविण्यात येते. एकूणच पालिकेच्या एस वॉर्ड अंतर्गतच वर्षाकाठी १ लाख १३ हजार ८८० लीटर डिझेल पुरविणे गरजेचे असताना फक्त अर्ध्याहूनही कमी डिझेलच पुरविण्यात येत असल्याने उर्वरित हजारो लीटर डिझेल जाते कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या डिझेलच्या भावाने जर याची तुलना केली असता, एकाच विभागात ६८ लाख ३२ हजार ८०० रुपये खर्च होत आहेत. प्रत्यक्षात एवढ्या पैशांच्या अर्ध्या किमतीचेही डिझेल नसल्याने यात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोपही वायंगणकर यांनी केला. फक्त एस विभागाची ही अवस्था असेल तर मुंबईत पालिकेचे २४ वार्ड असून २२७ नगरसेवक आहेत. तर प्रत्येक नगरसेवकाच्या तुलनेत वर्षाकाठी एकूण लाखो लीटर डिझेल मिळणे अपेक्षित असताना त्यातही हेराफेरी होत असल्याचा संंशय व्यक्त करण्यात येत आहे.
जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठरावीक वेळी धूर फवारणी करण्यात येते. त्यासाठी गरजेनुसार फवारणीसाठी लागणारे डिझेल पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.