उल्हासनगरमध्ये धुराचे साम्राज्य
By Admin | Updated: March 14, 2017 01:42 IST2017-03-14T01:42:16+5:302017-03-14T01:42:16+5:30
उल्हासनगरच्या खडी खदान डम्पिंगला आग लागून शहरभर धुराचे साम्राज्य निर्माण झाले. सतत लागणाऱ्या आगीमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे

उल्हासनगरमध्ये धुराचे साम्राज्य
उल्हासनगर : उल्हासनगरच्या खडी खदान डम्पिंगला आग लागून शहरभर धुराचे साम्राज्य निर्माण झाले. सतत लागणाऱ्या आगीमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे डम्पिंग हटावची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. पालिकेला पर्यायी डम्पिंग मिळेनासे झाल्याने सध्या आहे ते डम्पिंग बंद झाल्यास उल्हासनगरात जागोजाग कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती आहे.
म्हारळ गावाजवळील राणा डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने पालिकेने बंद केले. डम्पिंगवरील कचऱ्याचे ढीग खालील झोपडपट्टीवर कोसळल्याने जीवितहानीचा धोका होता. पर्यायी डम्पिंग मिळत नसल्याने नाईलाज म्हणून कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथे डम्पिंग सुरू करण्यात आले. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून येथे कचरा टाकण्यात येत आहे. मात्र कचऱ्याला सतत आगी लागत असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात हजारो जीन्स कारखाने असून कारखान्यातील अॅसिडयुक्त सांडपाणी उघड्या नाल्यांत सोडण्यात येत आहे. त्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. त्याचाही उग्र वास पसरलेला असतो.
नागरिकांत मळमळ, उलच्या, खाज येणे, त्वचारोगाचे प्रमाण मोठे असून क्षयरोगाचे सर्वाधिक रूग्णही याच परिसरात आहेत. यातच आता डम्पिंग ग्राऊंडच्या धुराची भर पडल्याने हा परिसर राहण्यास धोकादायक झाला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गेल्यावर्षी जीन्स कारखान्यावर बडगा उगारून कारवाईचे आदेश दिले होते. मात्र स्थानिक आमदारासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच मनधरणी केल्याने, मंत्री महादयांनी दिलेले आदेश काही तासांत मागे घेतले. जीन्स कारखान्यांच्या प्रदूषणामुळे आणि डम्पिंगच्या धुरामुळे या भागातून स्थलांतराची संख्या वाढली आहे. या रहिवाशांनी विकलेल्या निवासी घरातही आता जीन्स पँटशी संबधित कारखाने सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)