कल्याणमध्ये दुसऱ्या दिवशीही धुराचे लोट
By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:22+5:302016-06-02T01:21:22+5:30
येथील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मंगळवारी लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात आली. मात्र, धुराचे लोट कायम राहिल्याने बुधवारीही डम्पिंग धुमसत होते.

कल्याणमध्ये दुसऱ्या दिवशीही धुराचे लोट
कल्याण : येथील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मंगळवारी लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात आली. मात्र, धुराचे लोट कायम राहिल्याने बुधवारीही डम्पिंग धुमसत होते. डम्पिंग परिसरात दुपारी असलेल्या वाऱ्यामुळे आगीचे प्रमाण वाढले होते. त्यातून, निर्माण झालेला धूर शहरातील बहुतांश भागांत पसरला होता. यावर, पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य होत नसल्याने आता डम्पिंगवर मातीचा भराव टाक ण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. दरम्यान, या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. वाढती आग आणि धूर पाहता डम्पिंगला लागून असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले होते. वारा मोठ्या प्रमाणावर वाहत होता. त्यामुळे आगीचा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरला. त्यामुळे तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला, मळमळणे आदी त्रास झाला.
डम्पिंगच्या आगीच्या धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरले होते. आग विझवण्यासाठी महापालिकेच्या नऊ अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरापर्यंत विझलेली नव्हती. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहताच ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर येथील अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले.
मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप गुंड यांच्या नेतृत्वाखाली हे आॅपरेशन सुरू होते. परंतु, धुराचे लोट सुरूच राहिल्याने बुधवारीही डम्पिंगवर पाणी मारणे सुरू होते. यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टँकर पुरवण्यात आले. दरम्यान, आग आणि धूर आटोक्यात आणण्यासाठी डम्पिंगवर मातीचा भराव टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)आगीच्या घटना संशयास्पद
जानेवारीपासून आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. चालू वर्षात २, ११, ३१ जानेवारी, २१ मार्च आणि २८ मार्चला आग लागली होती. २०१० मध्ये डम्पिंगला मोठी आग लागली होती. त्याची पुनरावृत्ती मंगळवारी झाली. एकाच वेळी डम्पिंगच्या मोठा परिसराला आग लागणे, ही बाब संशयास्पद असल्याचेही बोलले जात आहे.