ढोल-ताशा पथक आणि आयोजकांतच वादाचे ढोल

By Admin | Updated: March 22, 2017 01:31 IST2017-03-22T01:31:08+5:302017-03-22T01:31:08+5:30

आवाजाच्या मर्यादेचे निर्बंध लागू झाल्याने गुढीपाडव्याच्या यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी करुन न घेण्याचा निर्णय

Dhol-Tasha Squad and Controversial drum in organizer | ढोल-ताशा पथक आणि आयोजकांतच वादाचे ढोल

ढोल-ताशा पथक आणि आयोजकांतच वादाचे ढोल

प्रज्ञा म्हात्रे / ठाणे
आवाजाच्या मर्यादेचे निर्बंध लागू झाल्याने गुढीपाडव्याच्या यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी करुन न घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतल्याने स्वागतयात्रेच्या मुख्य आकर्षणावरच गदा येणार आहे. या निर्णयावर पथकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आमचीच जाण्याची इच्छा नसल्याची टीका केली आहे. ही पथकेचनसतील, तर यात्रेला शोभा राहणार नाही. त्यामुळे स्वागतयात्रेत ढोल-ताशा असलाच पाहिजे, असा हट्ट ठाण्यातील तरुणांनी धरल्याने वादाचे ढोल आतापासूनच वाजू लागले आहेत.
त्यातच यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी यात्रेच्या आयोजकांची नसेल तर आमची असेल अशी हमी
सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघटनेने द्यावी, असेही आयोजकांचे म्हणणे असल्याने तोही वादाचा मुद्दा ठरणार असून त्याचा परिणाम संस्थांच्या सहभागावर होण्याची भीती वर्तवली जात आहे.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गेल्या १५ वर्षांपासून ठाण्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वागतयात्रा आयोजित केली जाते. अलिकडच्या काही वर्षांत आयोजकांनी ढोल-ताशा पथकांनाही स्वागतयात्रेत सहभागी करुन घेण्यास सुरूवात केली. ढोल-ताशांचे वादन तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने हे वादन गर्दीचे केंद्र ठरू लागले. पारंपरिक वेशभूषेत होणारे हे वादन हा स्वागतयात्रांचा ‘यूएसपी’ बनला. यंदा मात्र आवाजाच्या मर्यादेच्या बंधनांमुळे पथकांना सहभागी करुन घेतले जाणार नसल्याचा निर्णय आयोजकांनी सध्या तरी घेतला आहे. याबाबत आम्ही बैठका घेऊ, अशी सारवासारवही लगेचच त्यांनी केली.
त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून हा निर्णय घेताना आयोजकांनी नीट विचार केलेला नाही. चित्ररथ पाहायला जितकी गर्दी होत नाही, तितके ठाणेकर ढोल-ताशा
पथकांचे वादन पाहण्यासाठी
जमतात. पण आयोजकांचेच नियोजनच ढिसाळ असल्याने आम्हाला सहभागी होण्याची इच्छा उरली नसल्याचा संताप काही ढोल-ताशा पथकांनी व्यक्त केला. स्वागतयात्रेत पथक असायलाच हवे. ध्वनीप्रदुषण तर दोन माणसांमधल्या संभाषणाने देखील होत असते. त्याचा किती बाऊ करायचा? त्यामुळे आयोजकांवर आम्ही खरोखर नाराज आहोत.
ही तर ‘गरज सरो, वैद्य मरो,’ अशी अवस्था झाल्याचे काही पथकांनी लक्षात आणून दिले. स्वागतयात्रेतील ढोल- ताशा पथकांचे वादन पाहण्यासाठी आम्ही येत असतो. चार तासांच्या वादनाने असे किती ध्वनीप्रदूषण होणार आहे? इतर वेळी होणाऱ्या आवाजांचा, वाहनांच्या कर्कश हॉर्नचा त्रास होत नाही का? असा खडा सवाल करून मराठमोळ््या सणानिमित्त काढल्या जाणाऱ्या या स्वागतयात्रेत पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा पथक नक्कीच असले पाहिजे. ते असेल तरच या स्वागतयात्रेला काही अर्थ आहे, अशी भावना ठाण्यातील तरुणांनी व्यक्त केल्याने आयोजकांची पुरती कोंडी झाली आहे.

Web Title: Dhol-Tasha Squad and Controversial drum in organizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.