Devotees rush to save Tungarareshwar's ashram, petition for reconsideration | तुंगारेश्वरचा आश्रम वाचवण्यासाठी भक्तगण सरसावले , पुनर्विचार याचिका दाखल
तुंगारेश्वरचा आश्रम वाचवण्यासाठी भक्तगण सरसावले , पुनर्विचार याचिका दाखल

ठाणे : वसईच्या तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रम वाचवण्यासाठी महाराजांचे भक्तगण आणि बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्था पुढे आली असून आश्रम संस्थेने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर मदतीसाठी राज्य सरकारला साकडे घातले आहे.

हजारो वारकरी आणि भाविकांच्या श्रद्धेसाठी आश्रमाच्या स्थापनेच्या कागदपत्रांची शहानिशा करून आश्रमावर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश थांबविण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी करावी असे आर्जव केले आहे. किंबहुना आश्रमाला न्याय मिळावा म्हणून येत्या २२ आॅगस्ट रोजी अनेक संत-महंत हजारो भाविकांसह मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाडफाटा येथे महामेळावा घेणार असल्याचेही संस्थेने मंगळवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

४८ वर्षांपूर्वी वसईजवळ तुंगारेश्वर पर्वतावर ६९ गुंठे जागेत बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम उभे राहिले आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही या आश्रमाची ओळख आहे. परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्राचा विकास आश्रमामुळे झाला असून आश्रमामार्फत सामुदायिक विवाह,व्यसनमुक्ती मोहीम तसेच सातत्याने सामाजिक व वैद्यकीय शिबिरासारखे लोकपयोगी उपक्र म राबवले जातात. तरीही दहा वर्षांपूर्वी पर्यावरणाच्या मुद्यावर ‘कन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संघटनेचे देबी गोयंका यांनी याचिका दाखल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा आश्रम जमीनदोस्त करण्याचे आदेश ७ मे रोजी दिले. या अनुषंगाने सदानंद महाराज आश्रम संस्थेने संत, महंत व भाविकांमध्ये आश्रम वाचवण्यासाठी जनजागृती सुरु केली.

आदेश डावलले

आश्रमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी वनखात्याची जमीन प्रदान केली असून स्थानिक पारोळ ग्रामपंचायतीने घरपट्टीही लावली आहे. त्याबाबतची कागदपत्रे संस्थेकडे आहेत. वनखात्याच्या कारभारामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. अशा अनेक बाबी व्यवस्थित न मांडल्या गेल्याने सर्वोच्च न्यायालायने आश्रम तोडण्याचे आदेश दिले. तेव्हा आश्रम वाचवण्यासाठी भाविकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी भक्कम बाजू मांडण्याची विनंती केली आहे. या आश्रमाला वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संत, महंतांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. पत्रकार परिषदेला बालयोगी सदानंद महाराज आश्रम, तुंगारेश्वरचे अध्यक्ष विजय पाटील, विश्वनाथ वारिंगे महाराज, एकनाथ महाराज सदगिर उपस्थित होते.


Web Title: Devotees rush to save Tungarareshwar's ashram, petition for reconsideration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.