तीन खाडीकिनाऱ्यांचा बेल्जिअमद्वारे विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 00:32 IST2015-09-10T00:32:45+5:302015-09-10T00:32:45+5:30
गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे.

तीन खाडीकिनाऱ्यांचा बेल्जिअमद्वारे विकास
ठाणे : गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात बुधवारी बैठक घेऊन खाडीकिनाऱ्याचा तीन टप्प्यांत विकास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी सकाळी बेल्जिअमस्थितने पोलिसन या संस्थेचे क्रिस पोलिसन, गुल कृपलानी आणि महापालिका अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या कामाला गती मिळावी, यासाठी अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष कक्षाची निर्मिती केली असून त्यामार्फत १० नोव्हेंबरअखेर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी स्वारस्य देकार अभिव्यक्ती प्रक्रि या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पालिकेने सुरुवातीला हा संपूर्ण प्रकल्प बीओटीवर राबविण्याचे निश्चित केले होते. आता तीन टप्प्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून पहिला टप्पा हा महसूली उत्पन्नाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यात खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रकल्प महापालिका आणि वित्तीय संस्थेकडून आर्थिक साहाय्य घेऊन राबविण्याबाबत त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.