मिट्टी सत्याग्रहात शेतकरी आंदोलनाच्या पाठी उभे राहण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:41+5:302021-03-23T04:42:41+5:30
ठाणे : महात्मा गांधींनी १९३० साली केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला स्मरून आम्ही मिट्टी सत्याग्रह करीत आहोत. आमची माती, जमीन, संविधान ...

मिट्टी सत्याग्रहात शेतकरी आंदोलनाच्या पाठी उभे राहण्याचा संकल्प
ठाणे : महात्मा गांधींनी १९३० साली केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला स्मरून आम्ही मिट्टी सत्याग्रह करीत आहोत. आमची माती, जमीन, संविधान आणि लोकशाही जपण्यासाठी शेतकरी आंदोलनाला समर्थन देऊन अहिंसात्मक मार्गाने लढण्याचा संकल्प समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांच्या रंगमंचावर कलाकार, कार्यकर्त्यांनी मतकरी स्मृतिमालेच्या कार्यक्रमात केला.
दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर महिन्यात घेण्यात येणा-या या स्मृतिमालेच्या मार्च महिन्याच्या नवव्या पुष्पाचा विषय होता ‘मिट्टी सत्याग्रह’.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मोरे हिने केले. प्रास्ताविकात मीनल उत्तुरकर यांनी शेतकरी आंदोलनाची भूमिका विशद केली. कोरोनासंबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करत पार पाडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी एकेक मूठभर माती एका कलशात जमा केली आणि मी मिट्टी सत्याग्रही अशा बॅनरवर स्वाक्ष-या केल्या. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांनी सर्वांना मातीचा टिळा लावला.
यावेळी किसननगरच्या मुलामुलींनी अत्यंत अनोखी नृत्य नाटिका सादर करून या विषयाचा महत्त्व प्रभावीपणे मांडले. तर अनुजा लोहार, दुर्गा माळी, प्राची डांगे, अंजली लोहार, मंगम्मा धनगर यांनी यह धरती अपनी है, अपना अंबर है रे.. या गाण्यावर नृत्य सादर केले. सुशांत जगताप, निशांत पांडे, ओंकार गरड यांनी शेतकरी आंदोलनावर त्यांचे विचार मांडले. प्राची डांगे हिने माणसे या अनिल अवचट यांच्या पुस्तकातील दुष्काळाने गरीब शेतकरी यांच्या झालेल्या भयंकर परवडीच्या वर्णनाचे अभिवाचन केले.