जीएसटी लागू होऊनही मुद्रांक शुल्क अधिभाराचा भुर्दंड नागरिकांच्या डोक्यावर कायम

By धीरज परब | Updated: March 5, 2025 20:24 IST2025-03-05T20:24:09+5:302025-03-05T20:24:53+5:30

१० वर्षात एकट्या मीरा भाईंदरमधील घर, मालमत्ता खरेदीदारांनी भरले तब्बल ५२४ कोटींचे मुद्रांक शुल्क अधिभार.

Despite the implementation of GST the burden of stamp duty surcharge remains on the heads of citizens | जीएसटी लागू होऊनही मुद्रांक शुल्क अधिभाराचा भुर्दंड नागरिकांच्या डोक्यावर कायम

जीएसटी लागू होऊनही मुद्रांक शुल्क अधिभाराचा भुर्दंड नागरिकांच्या डोक्यावर कायम

धीरज परब / मीरारोड - व्यापाऱ्यांकडून वसूल केली जाणारी जकात बंद करून स्थानिक संस्था कर वसुलीसह १ टक्का मुद्रांक शुल्क वसुली २०१० साली सुरु करण्यात आली होती. स्थानिक संस्था कर देखील बंद झाला व जीएसटी लागू झाली पण व्यापाऱ्यांकडून जकात व एलबीटी वसुली ऐवजी सरसकट सुरु केलेला १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार राज्यातील महापालिका क्षेत्रात घर आदी मालमत्ता खरेदी करणाऱ्या नागरिकां कडून आजही वसूल केला जात आहे .  १ टक्का अधिभार आणि ५ टक्के जीएसटी अशी दुहेरी वसुली केली जात आहे.  एकट्या मीरा भाईंदर महापालिकेला १० वर्षात मुद्रांक शुल्क अधिभार पोटी तब्बल ५२४ कोटी २८ लाख ९३ हजार रुपये मिळाले असून अधिभारासह २०१७ - १८ पासून जीएसटीची देखील काही कोटींची रक्कम मिळाली आहे . राज्यातील मुंबई वगळता अन्य २६ महापालिकांची १ टक्का अधिभार आणि जीएसटी विचारात घेतली तर ती रक्कम हजारो कोटींच्या घरात आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नाचे  साधन म्हणून हद्दीत येणाऱ्या मालावर जकात घेतली जात होती .  जकात वसुली बंद करून १ एप्रिल २०१० साला पासून मीरा भाईंदर सह जळगाव , नांदेड - वाघाळा महापालिकेत एलबीटी सह १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार वसुली सुरु केली . नंतर टप्या टप्याने मुंबई वगळता राज्यातील अन्य सर्व महापालिका क्षेत्रात मुद्रांक शुल्क वर १ टक्का अधिभार वसूल केला जाऊ लागला .  

वास्तविक मालावर जकात व त्याला पर्याय म्हणून एलबीटी शासनाने आणली. १ ऑगस्ट २०१५ पासून ५० कोटी पेक्षा कमी रकमेची उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांची एलबीटी देखील बंद केली गेली . नंतर जीएसटी आल्याने एलबीटी पूर्णपणे बंद झाली .  परंतु जकातीशी घर - मालमत्ता खरेदीचा संबंध नसताना देखील सुरु केलेली १ टक्का मुद्रांक अधिभार वसुली आजही सुरु आहे . मुद्रांक शुल्कचा वसूल केलेला १ टक्का अधिभार हा  शासना कडून नंतर संबंधित महापालिकांना दिला जातो .  म्हणजे नागरिकांनी १ टक्का मुद्रांक अधिभार भरायचाच वरून १ ते ५ टक्के जीएसटी सुद्धा द्यायचा असा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागतोय . 

एकट्या मीरा भाईंदर महापालिकेला १० वर्षात ५२४ कोटी 
एकट्या मीरा भाईंदर महापालिकेला १ टक्का  मुद्रांक शुल्क अधिभार पोटी २०१५ - १६ ते २०२४ - २५ ह्या १० वर्षात तब्बल ५२४ कोटी २८ लाख ९३ हजार रुपये मिळाले आहेत . अधिभार २०१० साला पासून लागू झाला असला तरी २०१५ पर्यंतची आकडेवारी मिळू शकली नाही . मात्र ती रक्कम देखील काही कोटींची आहे . २०१७ - २०१८ साला पासून महापालिकेला जीएसटी अनुदान मिळत असून त्यात देखील घर , मालमत्ता खरेदीवर घेतल्या जाणाऱ्या जीएसटीचा समावेश आहे .  

नागरिकांच्या भुर्दंडात मेट्रो कराची वाढ 
जकातीला पर्याय म्हणून चुकीच्या पद्धतीने घर - मालमत्ता खरेदीवर सुरु केलेला १ टक्का मुद्रांक शुल्कचा भार नागरिकांवर असतानाच मालमत्ता खरेदीवर  १ ते ५ टक्के जीएसटी वसूल केली जात आहे . या शिवाय शहरीभागातीलमुंबई सह मीरा भाईंदर , कल्याण डोंबिवली , ठाणे , भिवंडी , नागपूर , पुणे आदी भागातील मेट्रोच्या कामाचा खर्च देखील मुद्रांक शुल्कचा आणखी १ टक्का मेट्रो कर लावून शासन वसूल करत आहे . गृहकर्जाच्या करारनाम्यावर देखील मुद्रांक व नोंदणीत वाढ शासनाने केली आहे . 

संजय पालांडे ( नागरिक) - सामान्य नागरिक आयुष्यातलं एक स्वप्न म्हणून घर किंवा जागा खरेदी करत असतो मात्र व्यापाऱ्यांच्या मालावर वसूल केली जाणारी जकात सामान्य नागरिकांच्या घर खरेदीत १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार रूपाने आजही वसूल केली जात आहे. दुसरीकडे जकात, एलबीटी बंद होऊन लागू असलेला जीएसटी देखील ५ टक्के वसूल करणे हा दुहेरी आर्थिक भुर्दंड व अन्याय आहे. हे रद्द करून नागरिकांना दिलासा दिला दिला पाहिजे.

के . आर . जाधव ( मुख्य लेखाधिकारी , महापालिका ) - मुद्रांक शुल्क हे शासनाचा महसूल विभाग आकारतो तर जीएसटी हे केंद्र शासनाने निश्चित केलेला आहे . त्यामुळे १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार आणि १ ते ५ टक्के जीएसटी हे दोन्ही आकारले जातात .

Web Title: Despite the implementation of GST the burden of stamp duty surcharge remains on the heads of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.