कंत्राटी कामगार वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:09 IST2020-10-09T00:09:13+5:302020-10-09T00:09:18+5:30
भिवंडी पालिका; कुटुंबावर आली उपासमारीची वेळ

कंत्राटी कामगार वेतनापासून वंचित
अनगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानाही कामगार आपला जीव धोक्यात घालून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पाइपलाइन, बोअरवेलची दुरुस्ती, व्हॉल्व्हमनचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून पाणीपुरवठा विभागात काम करणाºया कामगांराना किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावा, असे मागणी करणारे निवेदन श्रमजीवी संघटनेने आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना दिले आहे. आयुक्तांनी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकांºयासमवेत बैठक घेऊन कामगारांचा तीन महिन्यांचा पगार किमान वेतन कायद्यानुसार दिला जाईल, असे आश्वासन दिले. संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, कमलाकर गोरले, रंगनाथ तरे, संदीप पाटील, कंत्राटदार बाबुलाल पटेल आदी उपस्थित होते.
दरम्यान, पालिका प्रशासन याची कधी अमलबजावणी करणार याकडे कामगार आणि संघटनांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
आयुक्तांनी दिल्या सूचना
पेमेंटस्लिप, ओळखपत्र, भविष्य निर्वाह निधी, बोनस, सेफ्टी किट, गणवेश या सुविधा १५ दिवसांत देण्याची ग्वाहीही आयुक्तांनी दिली. तशा सूचनाही कार्यकारी अभियंता एल.पी. गायकवाड, शाखा अभियंता संदीप पटनावर यांना दिल्या आहेत.