डेंग्यूने ठाण्यात तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: August 31, 2016 03:10 IST2016-08-31T03:10:30+5:302016-08-31T03:10:30+5:30
ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली

डेंग्यूने ठाण्यात तिघांचा मृत्यू
ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. मागील तीन दिवसात तीन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने यावेळी दिली. तर आतापर्यंत २३७ जणांना डेंग्यूची लागण झाली असून ८२४ डेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ठाणेकरांचे आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी उपाय काय करणार असा सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी आरोग्य विभागाला केला.
शहरात पावसाची सध्या उघडझाप सुरु असल्याने ठाणेकरांचे आरोग्यदेखील बिघडले आहे. त्यामुळे सध्या ते कसे आहे, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी शहरात आतापर्यंत २३७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे व ८२४ डेंग्युचे संशयीत आढल्याचेही सांगितले. तर मुंब्य्रात एकाच दिवसात दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला असून शहरात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले. मुंब्य्रातील ज्या भागात अशा प्रकारे डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, त्याठिकाणी आरोग्य विभागाची अतिरिक्त टीम, फायलेरीया विभागाची टीम पाठविली असून तेथे ३७८ तापाचे रुग्ण आढळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.