उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाला हवे पोलीस संरक्षण आमदार कुमार आयलानी यांच्याकडे मागणी
By सदानंद नाईक | Updated: April 2, 2025 18:00 IST2025-04-02T18:00:03+5:302025-04-02T18:00:51+5:30
रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयातील डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्या सोबत वाद होत असल्याचे सांगून वाढीव पोलीस संरक्षणाची मागणी केली.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाला हवे पोलीस संरक्षण आमदार कुमार आयलानी यांच्याकडे मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापुरसह ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असल्याने, रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी यांच्यातील वाद वाढल्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान रुग्णालय पाहणीसाठी आलेल्या आमदार कुमार आयलानी यांचे याकडे लक्ष वेधून पोलीस संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांचे आशास्थान निर्माण झाले. कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, ग्रामीण परिसर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. वाढत्या रुग्ण संख्येचा ताण रुग्णालय प्रशासनावर पडला आहे. रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. मंगळवारी आमदार कुमार आयलानी हे कामकाजाची व समस्याच्या पाहणी करण्यासाठी रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांच्या सोबत संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्यासह अन्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वाढत्या रुग्ण संख्येने रुग्णालयात अनेक समस्या उभ्या ठाकल्याचे सांगितले. तसेच रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयातील डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्या सोबत वाद होत असल्याचे सांगून वाढीव पोलीस संरक्षणाची मागणी केली.
आमदार कुमार आयलानी यांनी औषधाचा तुटवडा, डॉक्टरांची अपुरी संख्या तसेच रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालय डॉक्टर अन्य कर्मचारी यांच्यात होत असलेल्या वादाबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत वरिष्ठकडे याबाबत म्हणणे मांडणार असल्याचे आश्वासन आयलानी यांनी रुग्णालयाला दिले. तसेच रुग्णालयाला वाढीव पोलीस बंदोबस्त देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. क्षमते पेक्षा २० टक्के कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार केले जात असून रुग्णालयाची रुग्णबाह्य विभागाची संख्या दररोज १५०० पेक्षा जास्त आहे. या वाढत्या रुग्ण संख्येने रुग्णालयात सकाळी यात्रा भरल्याचे चित्र असते. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांचे म्हणणे आहे.