उल्हासनगरातील पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी
By सदानंद नाईक | Updated: July 26, 2023 17:26 IST2023-07-26T17:26:28+5:302023-07-26T17:26:46+5:30
महापालिकेने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

उल्हासनगरातील पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी
उल्हासनगर : वालधुनी नदीचे पुराचे पाणी सखल भागातील झोपडपट्टी घुसल्याने, शेकडो जणांचे संसार उघडयावर आले होते. अश्या पूरबाधितांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीचे शिवाजी रगडे व माजी नगरसेविका सविता रगडे- तोरणे यांनी तहसिलदार यांना केले आहे.
उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका गेल्या १९ जुलै रोजी शहरातील भारतनगर, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, आम्रपालीनगर हिराघाट, शांतीनगर येथील मातोश्रीनगर, राजीव गांधीनगर आदी ठिकाणच्या शेकडो घरात पुराचे पाणी घुसले होते.
महापालिकेने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पुराच्या पाण्याने, पूरग्रस्त नागरिकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, शालेय मुलांचे शैक्षणिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत. अश्या पूरग्रस्त नागरिकांच्या घराचे पंचनामे करून, नुकसान भरपाई करण्याची मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे-रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केले.