टाउन प्लानिंग अॅक्टनुसार कारवाईची मागणी
By Admin | Updated: March 22, 2017 01:20 IST2017-03-22T01:20:55+5:302017-03-22T01:20:55+5:30
केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाउन प्लानिंग अॅक्टनुसार कारवाई व्हावी

टाउन प्लानिंग अॅक्टनुसार कारवाईची मागणी
डोंबिवली : केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाउन प्लानिंग अॅक्टनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदार विश्वनाथ पटवर्धन यांनी पोलिसांकडे केली. मानपाडा पोलिसांनी शनिवारी पटवर्धन यांचे म्हणणे जाणून घेतले. या वेळी त्यांनी पोलिसांना निवेदन सादर केले. त्यात दखलपात्र गुन्ह्यांप्रकरणी एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
केडीएमसीचे ई प्रभागाचे नवे कार्यालय येथील दावडी परिसरातील ‘रिजन्सी गार्डन’मधील प्रशस्त जागेत सुरू करण्यात आले आहे. परंतु, ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची आहे, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे हे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याप्रकरणी पटवर्धन यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आयुक्त ई. रवींद्रन आणि अन्य एका खाजगी संस्थेच्या विरोधात त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्याची चौकशी शनिवारपासून सुरू झाली.
ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीच्या असलेल्या जागेवर दादागिरी आणि जबरदस्तीच्या जोरावर केडीएमसी आणि अन्य एका संस्थेने बेकायदा बांधकाम केले आहे. हा प्रकार म्हणजे सोसायटीचा विश्वासघात, फसवणूक आहे. त्यामुळे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पटवर्धन यांनी पोलिसांकडे चौकशीदरम्यान केली. (प्रतिनिधी)