सहावीच्या पुस्तकांना विलंब
By Admin | Updated: June 15, 2016 02:26 IST2016-06-15T02:26:35+5:302016-06-15T02:26:35+5:30
सहावीेचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलल्यामुळे पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध झालेली नाहीत. मराठी माध्यमाची सर्व पुस्तके आली असली तरी इंग्रजी माध्यमाचे इतिहासाचे पुस्तक अद्याप आलेले

सहावीच्या पुस्तकांना विलंब
ठाणे : सहावीेचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलल्यामुळे पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध झालेली नाहीत. मराठी माध्यमाची सर्व पुस्तके आली असली तरी इंग्रजी माध्यमाचे इतिहासाचे पुस्तक अद्याप आलेले नाही. इंग्रजी - बालभारतीचे पुस्तकही शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी दुकानांत उपलब्ध झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जून महिना उजाडला की, शाळांच्या खरेदीची लगबग सुरू होते. अनेक जण गर्दी टाळण्यासाठी दहा, पंधरा दिवस आधीच खरेदी करतात. तर काही शाळा सुरू होण्याच्या एक ते दोन दिवस अगोदर खरेदी करणे पसंत करतात. बुधवारपासून सर्वत्र शाळा सुरू होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील ठिकठिकाणी वह्या - पुस्तक विक्रेत्यांकडे खरेदीची लगबग दिसून आली. सायंकाळी तर हा गर्दीचा महापूर ओसंडून वाहत होता. परंतु, काही पुस्तके वेळेत येतात तर काही पुस्तकांना विलंब लागतो हा नेहमीचाच अनुभव विद्यार्थी आणि पालकांना यंदाही आला. मार्च महिन्यापासून दुकानांत पुस्तके येण्यास सुरूवात होतात. मे महिन्यापर्यंत सर्वच पुस्तके आलेली असतात. यावर्षी मात्र, सहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने त्याची पाठ्यपुस्तके १५ दिवसांपूर्वी दुकानांत येण्यास सुरूवात झाली. मराठी माध्यमांची सर्व पुस्तके आली असली तरी इंग्रजी माध्यमांची पुस्तके मात्र, हळूहळू येत आहेत. इतिहासाचे पुस्तक आता बाकी असून ते एक ते दोन दिवसांत येईल, असे पुस्तक विक्रेते कुणाल विकम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सहावीच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच गाईडला उशीर झाला आहे. इंग्रजी माध्यमाची सर्वच विषयांची गाईडस् बाकी असून मराठी माध्यमाच्या चार विषयांची गाईडस् येणे बाकी आहे. एक ते दोन आठवड्यांत उर्वरित विषयांचे येतील, असे विकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)