ठाणे : यंदा २१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून, त्या दिवसापासून उत्तरायणास प्रारंभ होईल. त्या दिवशी दिवस १० तास ५७ मिनिटांचा असून, रात्र १३ तास ३ मिनिटांची असेल. यानंतर दिवस मोठे होऊ लागतील. दिवस वाढणे ही नकारात्मक नव्हे, तर आनंददायी घटना असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते व - खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी नमूद केले.
सूर्य उत्तरायणात प्रवेश करत दिवस वाढू लागण्याची खगोलीय घटना म्हणजे मकरसंक्रांत असून, या सणाबाबत समाजात असलेली 'संक्रांती अशुभ असते' ही समजूत पूर्णतः चुकीची असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
मकरसंक्रांत ही निसर्गातील सकारात्मक बदलाची आणि आनंदाची घटना असून, ती अशुभ मानण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. आपली पंचांग ही निरयन राशी-नक्षत्रांवर आधारित असल्यामुळे बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मकरसंक्रांतीचा सण १४ जानेवारी रोजी साजरा करावा, असे सोमण यांनी सांगितले. मकर संक्रांत नेहमीच १४ जानेवारीलाच येते, ही समजूतही चुकीची आहे.
२१०० सालापासून मकरसंक्रांतीचा सण १६ जानेवारीलाच येणार
मकरसंक्रांतीबाबत दरवर्षी अनेक समज-गैरसमज केले जातात. मात्र, १८९९ मध्ये ती १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत हा सण १४ जानेवारीलाच येत होती; मात्र १९७२ ते २०८५ या कालावधीत ती कधी १४, तर कधी १५ जानेवारीला येईल.
पुढे २१०० पासून मकरसंक्रांती १६ जानेवारीला येईल, तर सन ३२४६ मध्ये ती १ फेब्रुवारीला येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. त्यामुळे मकरसंक्रांतीचा आणि १४ जानेवारी या तारखेचा थेट संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.