कर्जमाफी हा अंशत: उपचार आहे
By Admin | Updated: April 25, 2017 00:03 IST2017-04-25T00:03:08+5:302017-04-25T00:03:08+5:30
कर्जमाफी हा अंशत: उपचार आहे. शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव निश्चित केला पाहिजे. तूरडाळीला १३ हजार रुपये क्विंटल भाव होता

कर्जमाफी हा अंशत: उपचार आहे
ठाणे: कर्जमाफी हा अंशत: उपचार आहे. शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव निश्चित केला पाहिजे. तूरडाळीला १३ हजार रुपये क्विंटल भाव होता, तो पाच हजार क्विंटलवर घसरला. सरकारने दक्षिण आफ्रिकेतून तुरीची आयात केल्याने त्याचा फटका इथल्या शेतकऱ्यांच्या तूरडाळीला बसला, अशी खंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अनासपुरे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करतोय, पण कृषीमाल विकणाऱ्या व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याचे एकही उदाहरण नाही. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे, हाच ‘नाम’ फाउंडेशनचा उद्देश आहे. आम्ही ‘इंडिया’ व ‘भारत’ यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरात शेतकऱ्यांनी थेट माल विकला, तर त्यांच्यातही आत्मविश्वास निर्माण होईल. २०१५ साली भयंकर दुष्काळ होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात काही पडले नाही. त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. २०१६ मध्ये पीक आले, पण हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर पुन्हा मोठे संकट उभे राहिले. ‘नाम’ म्हणजे माणसाने माणुसकीसाठी चालवलेली चळवळ आहे. धान्य महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला, तर इतर शहरांतही हा महोत्सव राबवला जाईल. शेतकरी आपले बांधव आणि त्यांची आत्महत्या हा चिंतेचा विषय असायला हवा. शेतकऱ्यांवर असाच अन्याय होत राहिला, तर आपल्याकडे खूप पैसे असतील, फ्लॅट्स असतील, पण खायला अन्नधान्य नसेल. गारपीट, दुष्काळ, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या हातात नाहीत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई आणि त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांमधील प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचार संतापजनक बाब आहे. अशा भ्रष्टाचाऱ्यांकडून दोन हजारपट दंड वसूल करा, जेणेकरून पुन्हा भ्रष्टाचार करण्याची त्यांची हिम्मत होणार नाही.
गरिबांप्रमाणे सुशिक्षित कुटुंबांतदेखील हुंडा पद्धत सुरू आहे. त्यासाठी सामूहिक विवाहाची वृत्ती वाढावी, असे नमूद करून अनासपुरे म्हणाले की, कृषी विद्यापीठात लावलेले शोध खाजगी कंपन्यांना न विकता शेतकऱ्यांना द्यावे. संशोधनआधारित शेती व्हावी. कोरडवाहू शेतकऱ्यांची समस्या समजून घ्यायला हवी. शेतकऱ्यांचा माल साठवून ठेवण्यासाठी गोडाउन वाढायला हवी.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे आंबा महोत्सव व नाम फाउंडेशन आणि संस्कार संस्था यांच्यावतीने धान्य महोत्सव गावदेवी मैदान येथे १ ते १० मे या कालावधीत आयोजित केला आहे. देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दापोली, पावस या ठिकाणांहून ४५ आंबा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
याचबरोबर १ ते ४ मे या कालावधीत गावदेवी मैदान, ६ ते १० मे या कालावधीत माझी आई शाळा, पातलीपाडा व ११ ते १२ मे या कालावधीत कासारवडवली, ओवळा याठिकाणी धान्य महोत्सव आयोजित केला जाणार असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले. धान्य महोत्सवात १५ स्टॉल्स असून त्यासाठी वेगळे दालन उभारले जाणार आहे. हिंगोली व बीड या जिल्ह्यांतून जवळपास ४०० शेतकऱ्यांचे धान्य या ठिकाणी असणार आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून २५ शेतकरी या महोत्सवात सहभागी होतील. तूरडाळ, गहू, हरभरा, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद, मसाले हे धान्य महोत्सवात विक्रीसाठी असणार आहे, असे अनासपुरे यांनी सांगितले. तसेच, या धान्याचा दर्जाची हमी ‘नाम’ देणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)