दत्तारामभाऊ कोयंडेचे कार्य प्रेरणादायी- लोकमत दिनविशेष
By Admin | Updated: August 9, 2014 00:37 IST2014-08-08T21:37:58+5:302014-08-09T00:37:27+5:30
मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मा

दत्तारामभाऊ कोयंडेचे कार्य प्रेरणादायी- लोकमत दिनविशेष
आचरा : मालवण, मिठबाव आणि शिरोड्यात मिठाच्या सत्याग्रहींना आवरणे ब्रिटीश सरकारला कठीण झाले होते. अनेक लोक गोळीबारांनी रक्तबंबाळ झाले. सरकारने शेकडो सत्याग्रहींना पकडून तुरूंगात टाकले. याचवेळी कराची बंदरकिनारीही मिठाचा सत्याग्रह सुरू झाला. या सत्याग्रहात जयरामदास, दौलतराम, नारायण दास आनंदजी, नसरबाणजी जमशेठजी आदी कराचीतील लोकनेते सामील झाले. अशावेळी हुतात्मा दत्तारामभाऊ कोयंडे हा ‘कोकणी’ वीरही या सत्याग्रहात सामील झाला आणि हुतात्मा झाला.
महात्मा गांधींनी दांडी येथे पदयात्रेने जाऊन तेथील समुद्र काठावरील मुठभर मीठ उचलून सरकारचा कायदा मोडला. त्यांनी सुरू केलेल्या या मिठाच्या सत्याग्रहाचे लोण हा हा म्हणता देशभर पसरले होते. या आंदोलनात दत्ताराम भाऊंचे कार्य प्रेरणादायी असेच आहे. वीर दत्तारामभाऊ कोयंडे यांचा जन्म मालवण तालुक्यातील संस्थानकालीन आचरा पिरावाडी येथे १५ जुलै १९०७ रोजी झाला. दुर्दैवाने त्यांचे मातृछत्र वयाच्या पाचव्या वर्षी हरपले. त्यांचे वडील लक्ष्मण कोयंडे त्याचवेळी पोट भरण्यासाठी कराची केमारी येथे कस्टम खात्यात नोकरीला होते. त्यांनी मुलांचे संगोपन उत्तमप्रकारे केले. दत्तारामचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केमारी येथे झाले. मिठाच्या सत्याग्रहात पकडलेल्या सत्याग्रहींवर १६ एप्रिल १९३० रोजी कोर्टात खटल्याची सुरूवात झाली. कोर्टातील या खटल्याची बातमी अगोदरच लोकांना कळल्याने आवार फुलून गेले होते. सकाळी १० वाजल्यापासून लोक गटागटाने येत होते. आपल्या आवडत्या नेत्यावर अन्याय होत आहे, या भावनेने जमाव कोर्टाच्या दिशेने सरकत होता. गांधीचा जयजयकार करीत होते. कोर्टाच्या दिशेने दगड-विटांचे वर्षाव होत होते. जमाव मागे हटण्याची चिन्हे दिसत नव्हती. बंदुकीच्या फैरी झडू लागल्या. बेफाम झालेला जमाव मागे हटविण्यासाठी वीर दत्ताराम जमावासमोर जाऊन त्यांना मागे हटविण्याचा प्रयत्न करीत होता. इतक्यात कोर्टाच्या गच्चीवरून ३ गोळ््या दत्तारामच्या छातीत आणि डोक्यामध्ये घुसल्या आणि वीर दत्ताराम हुतात्मा
झाला. (वार्ताहर)
मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मा
मिठाच्या सत्याग्रहातील दत्ताराम देशातील पहिला हुतात्मा झाला. कराची मिठाच्या सत्याग्रहात दत्ताराम शहीद झाल्याचे कळताच कराचीतील सारा समाज हळहळला. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक सामील झाले. हुतात्मा दत्तारामच्या नावाने महाराष्ट्रात उल्हासनगर येथे तसेच त्यांच्या जन्मगावी आचरा येथे स्मारक आहे. तसेच मुंबई येथे माजगाव येथे एका रस्त्याला दत्ताराम यांचे नाव दिलेले आहे. शासनाने आचरा गावी हमरस्त्यावर त्यांचे स्मारक उभारले आहे. त्यांच्या आठवणींना दरवर्षी उजाळा दिला जातो. त्यादिवशी विविध कार्यक्रम होतात.