‘दिव्या’खालचा अंधार दूर होणार
By Admin | Updated: March 22, 2017 01:27 IST2017-03-22T01:27:41+5:302017-03-22T01:27:41+5:30
महापालिका निवडणुकीत मुख्य आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या दिव्याच्या विकास कामांचा नारळ अखेर पहिल्याच महासभेत फुटला आहे.

‘दिव्या’खालचा अंधार दूर होणार
ठाणे : महापालिका निवडणुकीत मुख्य आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या दिव्याच्या विकास कामांचा नारळ अखेर पहिल्याच महासभेत फुटला आहे. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केल्याचे यातून दिसत असून त्याची ही सुरुवात असल्याचे बोलले जात आहे.
अनधिकृत बांधकामांचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवा गावात मूलभूत सोयीसुविधांच्या नावाने मात्र बोंबच असल्याचे दिसते आहे. पाणी नाही, वेळेत वीज नाही, रस्ते नाहीत, वेळेवर रिक्षा नाहीत, डंपिंगची दुर्गंधी अशा वातावरणात येथील रहिवाशांना राहावे लागत आहे. विशेष म्हणजे या गावात मराठमोळ्या नागरिकांचे प्राबल्य आहे. त्यामुळेच येथील नगरसेवकांच्या ११ जागांचा विचार करु न महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिवा गावात सभा घेऊन दिव्याच्या विकासाचे आश्वासन दिले होते. परंतु, या दोन्ही पक्षाला येथे प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान शिवसेनेने येथे केवळ विभागीय मेळावे घेऊन दिव्याच्या विकासाचा दावा केला होता. त्यानुसार सत्तेत आल्यानंतर याच विकास कामांचा नारळ पहिल्याच महासभेत फोडण्यात आला आहे. यामध्ये पोलीस स्टेशन, बस स्टँड, मार्केट, संप व इएसआर, प्रभाग कार्यालय, हॉस्पीटल, १५ मीटर रु ंद रस्ता, पार्कींग आणि अग्निशमन केंद्राचा समावेश आहे.
याच बरोबर रेल्वेने या आगासन येथील सेक्टर १० मधील १३.८७ हेक्टरचे आरक्षण ताब्यात न घेतल्याने महापालिकेने अखेर या ठिकाणीही दिव्याच्या विकासासाठी योग्य ठरतील अशा प्रकल्पाच्या नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला असता त्याला एकमताने मंजुरी मिळाल्याने आता दिव्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)