Dahi Handi 2022 : ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू
By अजित मांडके | Updated: August 20, 2022 15:33 IST2022-08-20T15:28:59+5:302022-08-20T15:33:44+5:30
Dahi Handi 2022 : जखमी गोविंदापैकी ५२ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

Dahi Handi 2022 : ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू
ठाणे - दोन वर्षानंतर मोठय़ा जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहांडी उत्सवात हंडी फोडतांना तब्बल ६४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील ५२ वर्षीय गोविंदावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर अन्य ११ रुग्णांवर कळवा व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदापैकी ५२ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.
यंदा दहीहांडीचा जोष मोठय़ा दिमाखात पाहावयास मिळाला. ठाण्यातील हंडी फोडण्यासाठी मुंबई, नवीमुंबई, ठाणो आदी भागातून हजारो गोंविदा शुक्रवारी ठाण्यात दाखल झाले होते. मात्र थर रचताना काही गोविदांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यानुसार तब्बल ६४ गोविंदा दहीहांडीचे थर रचतांना खाली पडून जखमी झाल्याचे दिसून आले. यातील नौपाडा येथे राहणारे संतोष शिंदे (५२) हे प्रभात सिनेमा येथे हंडीचे थर लावतांना पडले होते. ते बेशुध्द झाल्याने त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सुरज पारकर (३८) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय नितीन चव्हाण (१६), शैलेश पाठक (३२), शितलू तिवारी (२५), साहिल जोगळे (१५), आनंद रानु (०५), सनी गुरव (१२), बालाजी पाटील (३०), जाहीद शेख (२०) यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण 64 गोविंदापैकी १२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ५२ जणांवर प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, ठाणे महानगपालिकेच्या वतीने ठाणे शहरातील मुख्य आठ दहीहंडीच्या ठिकाणांपैकी चार ठिकाणी चार वैद्यकीय पथके कार्यरत ठेवली होती व उर्वरीत चार ठिकाणी एक वैद्यकीय पथक फिरते ठेवले होते. त्यानुसार दुर्घटनाग्रस्त गोविंदांना प्रथमोपचार देऊन सोडून दिले आहे.