डहाणू स्टेशनला वारली साज
By Admin | Updated: February 8, 2017 04:01 IST2017-02-08T04:01:27+5:302017-02-08T04:01:27+5:30
डहाणू रोड रेल्वे स्थानकास सुशोभीकरण व रंगरंगोटीच्या माध्यमातून वारली चित्रकलेचा साज चढविण्यात आला आहे.

डहाणू स्टेशनला वारली साज
अनिरुद्ध पाटील, डहाणू
डहाणू रोड रेल्वे स्थानकास सुशोभीकरण व रंगरंगोटीच्या माध्यमातून वारली चित्रकलेचा साज चढविण्यात आला आहे. या मेकओव्हरने स्थानकाचे रुपडे पालटण्यासह विविध पायाभूत सुविधा उपलब्ध केल्याने प्रवाशी तसेच डहाणूकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
डहाणू रोड हे सुरक्षित स्थानक म्हणून नावारूपाला येत आहे. येथील लोकलच्या फेऱ्या वाढवून, सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी स्थानकाला भेट दिली. त्या अनुषंगाने हा कायापालट झाला आहे. हे करतांना स्थानिक संस्कृतीची ओळख परगावातील प्रवाशांना व्हावी या दृष्टीने जातीने लक्ष दिले आहे. या करिता स्थानकाच्या आत व बाहेर येथील लोक संस्कृती, रूढी-परंपरा, भौगोलिक माहिती गोष्टीरूपाने वारली चित्रकलेच्या माध्यमातून चितारण्यात आली आहे.
स्थानिक वारली चित्रकारांनी हे उत्तम कार्य करून अंगिभूत कलेचे सादरीकरण केले आहे. २०११ सालचा पद्म पुरस्कार विजेता डहाणू तालुक्यातील जिव्या म्हसे यांचे चिरंजीव सदाशिव यांच्या नेतृत्वाखाली पंधरा कलाकारांनी हा साज चढवला आहे. सदाशिव यांनी ब्राझील, सिंगापूर, इटली, पॅरिस, जर्मनी, लंडन आदि देशांमध्ये जाऊन वारली चित्रकलेचा ठेवा सातासमुद्रापलीकडील मातीत रुजवण्याचे कार्य हाती घेतले आहे. शिवाय देशातील सर्व राज्यात जाऊन ते तळागाळापर्यंत पोहचिवण्याचे मोलाचे काम सुरु केले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कला पोहचिवण्यायासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली असून हिंदीसह इंग्रजी, जपानी भाषा अवगत केली आहे. तर अन्य भाषा आत्मसात करण्यासाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सांताक्रुझ रेल्वे स्थानकानंतर डहाणू रोड येथे वारली चित्रकलेचा हा आविष्कार पाहता येऊ शकतो.