नोटांच्या ‘रेशनिंग’ने ग्राहक हैराण

By Admin | Updated: November 11, 2016 05:51 IST2016-11-11T05:51:42+5:302016-11-11T05:51:42+5:30

बड्या रकमेच्या नोटा रद्द झाल्यामुळे हातखर्चालाही पैसे शिल्लक न राहिल्याने गुरुवारी लक्षावधी बँक ग्राहकांनी पाचशे-हजाराच्या नोटा बदलून घेण्याकरिता तसेच काहींनी रोकड

Customer 'harness' of notes | नोटांच्या ‘रेशनिंग’ने ग्राहक हैराण

नोटांच्या ‘रेशनिंग’ने ग्राहक हैराण

ठाणे : बड्या रकमेच्या नोटा रद्द झाल्यामुळे हातखर्चालाही पैसे शिल्लक न राहिल्याने गुरुवारी लक्षावधी बँक ग्राहकांनी पाचशे-हजाराच्या नोटा बदलून घेण्याकरिता तसेच काहींनी रोकड खात्यात जमा करण्याकरिता बँकेत धाव घेतल्याने न भुतो... असा गोंधळ उडाला. खात्यात पैसे जमा आहेत, खिशात बड्या नोटा आहेत, परंतु खर्चाला मिळालेल्या रकमेचे रेशनिंग झाले आहे, असा संतापजनक अनुभव ग्राहकांना आला.
गुरुवारी सकाळपासून सर्वच बँकांच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. काही बँकांनी ग्राहकांचा गोंधळ होऊ नये, याकरिता चोख बंदोबस्त केला होता, तर काही बँकांमध्ये कमालीचा गोंधळ अनुभवास येत होता.
नोटा बदलून घेण्याकरिता आलेल्यांना एक फॉर्म भरणे सक्तीचे केले होते. त्यासोबत काही बँकांमध्ये पॅन कार्ड, तर काही बँकांमध्ये आधार कार्डाची झेरॉक्स प्रत मागितली जात होती. यामुळे झेरॉक्स दुकानांवर झुंबड उडाली होती.
प्रत्यक्ष कॅश काउंटरला पोहोचल्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मुदतीनुसार ४ हजार रुपये नव्हे, तर १ किंवा २ हजार रुपये दिले जात होते. काही बँकांनी १० व २० रुपयांच्या नोटा दिल्याने पैसे कसे व कुठे ठेवायचे, असा प्रश्न ग्राहकांना पडला. नव्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा कधी येणार? आणि नोटांच्या रेशनिंगचे हे दुष्टचक्र कधी संपणार? याचे ठोस उत्तर बँकांच्या व्यवस्थापकांकडेही नव्हते.
रिझर्व्ह बँक मुंबईत आहे. नोटांची छपाई नाशिकमध्ये होते. ठाणे-डोंबिवलीत नव्या नोटा पोहोचत नाहीत. मात्र नागपूर, गुजरातमधील ग्राहकांना मिळतात, हे काय राजकीय गौडबंगाल आहे, असा सवाल ग्राहक करीत होते. (प्रतिनिधी)

काही छोटे उद्योजक गुरुवारी पैसे काढण्याकरिता बँकेत गेले असता त्यांनाही त्यांच्या मागणीनुसार पैसे देण्यास नकार देण्यात आला. काही उद्योजकांना तर तुमचे केवायसी अर्ज भरलेले नसल्याने पैसे देता येणार नाहीत, असे सांगण्यात आले. काल-परवापर्यंत ज्या बँकांना केवायसीची आठवण झाली नव्हती, त्यांना अचानक गुरुवारीच ती कशी झाली, असा सवाल त्यांनी केला.


अलिबाग : अलिबाग-रायगड जिल्ह्यात पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर लोकांनी रांगा लावल्या. मात्र, सहकारी व अर्बन बँकांना नोटांचा पुरेसा पुरवठाच न झाल्याने एकच गोंधळ माजला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात ५८ शाखा असून, त्यांना ३५ कोटी रुपये गरजेचे होते. पण, स्टेट बँक आॅफ इंडियाकडून अवघी १ कोटी रुपयांची रोकड मिळाल्याने अडचण झाल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली. जिल्ह्यातील काही पतसंस्थांनी नोटा स्वीकारल्या; परंतु नोटा स्वीकारण्याबाबत आदेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक पतसंस्थांनी खातेदारांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला.

Web Title: Customer 'harness' of notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.