शिवसेनेला घराणेशाहीचा शाप

By Admin | Updated: January 25, 2017 04:52 IST2017-01-25T04:52:03+5:302017-01-25T04:52:03+5:30

अन्य पक्षातील घराणेशाहीवर तोंडसूख घेणाऱ्या शिवसेनेत निवडणुकीच्या तोंडावर घराणेशाही उफाळून आली आहे. मात्र त्याचवेळी

The curse of the dynasty of Shivsena | शिवसेनेला घराणेशाहीचा शाप

शिवसेनेला घराणेशाहीचा शाप

अजित मांडके/ नामदेव पाषाणकर/ ठाणे
अन्य पक्षातील घराणेशाहीवर तोंडसूख घेणाऱ्या शिवसेनेत निवडणुकीच्या तोंडावर घराणेशाही उफाळून आली आहे. मात्र त्याचवेळी या घराणेशाहीला विरोध वाढू लागला आहे. खासदार राजन विचारे यांना पत्नी व पुतण्याकरिता, आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नीला व भावाला, आमदार प्रताप सरनाईक यांना पत्नी व मुलाकरिता, आमदार सुभाष भोईर यांना मुलाकरिता आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भावाकरिता तिकीटे हवी आहेत. नेते ‘इलेक्टीव्ह मेरिट’ या गोंडस नावाखाली आपल्या घरात उमेदवारीची खिरापत वाटणार असतील तर सामान्य शिवसैनिकांनी काय फक्त सतरंजा उचलायच्या का, असा सवाल काही शिवसैनिक करीत आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांच्या जवळपास ७० नातलगांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. आतापर्यंत शिवसेनेकडे ५१५ जणांनी भरलेल्या उमेदवारी अर्जात ५० बिगर मराठी लोकांनी तिकीटे मागितली आहेत. तिकिटे मागणाऱ्यांमध्ये केवळ तीन डॉक्टर, दोन वकीलांचा समावेश असून इतर उमेदवार हे अल्प व काही उच्च शिक्षित आहेत. सर्वाधिक ३१ अर्ज हे कोपरीतील प्रभाग क्र मांक २० मधून आले असून प्रभाग ३० मधून एकाही इच्छुकाने अर्ज भरलेला नाही, प्रभाग २६ मधून केवळ दोनजणांनी अर्ज दिले असून ते दोघे पती पत्नी आहेत.
शिवसेनेतील काही जुनी आणि नवी घराणी मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. या घराणेशाहीला मागील निवडणुकीत देखील निष्ठावान शिवसैनिकांनी विरोध केला होता. खासदार विचारे यांची पत्नी व पुतण्या, आमदार फाटक यांची पत्नी जयश्री हिने प्रभाग १८ आणि भाऊ राजेंद्र याने दोन प्रभागातून अर्ज भरले आहेत. आमदार सरनाईक यांनी पत्नीसाठी प्रभाग ७ मध्ये तर मुलगा पूर्वेश याने प्रभाग १४ वर दावा केला आहे. दुसरीकडे आमदार भोईर यांनी मुलगा सुमितसाठी प्रभाग २९ मधून अर्ज भरला आहे. पालकमंत्री शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याने प्रभाग १८ मध्ये उमेदवारी मागितली आहे. माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी स्वत:साठी आणि सुनेला प्रभाग ४ मधून आणि पत्नी आणि मुलाला प्रभाग ७ मधून उमेदवारी मागितली आहे. अशोक वैती यांनी स्वत:साठी १३ मधून आणि पत्नीसाठी १३ आणि १९ मधून अर्ज भरले आहेत. संजय मोरे यांनी पत्नीसाठी प्रभाग १८ मध्ये अर्ज दाखल केला आहे. माजी महापौर स्मिता इंदुलकर यांना पुन्हा नशीब अजमावयाचे आहे. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मुलगा स्वप्नील, पत्नी गीता यांच्यासाठी प्रभाग २० मधून उमेदवारी मागितली आहे.
शिवसेनेत अलीकडेच डेरेदाखल झालेल्या भोईर अ‍ॅण्ड कंपनीने पक्षाकडे चार जागांचा आग्रह धरला आहे. यामध्ये देवराम भोईर स्वत:, त्यांचा मुलगा संजय, भूषण आणि संजय यांची पत्नी उषा भोईर यांचा समावेश आहे. इतर नगरसेवकांमध्ये प्रभा बोरीटकर यांनी स्वत: आणि पती, मुलगा असे तीन भरले आहेत.
महेश्वरी तरे यांनी पतीसह तीन जागेवर दावा केला आहे. नगरसेवक सुधीर भगत दोन जागा, स्नेहा पाटील दोन, हिराकांत फर्डे दोन, तर टेकडीवरील नगरसेविका राधा फत्तेबहादूर यांनी चार, तर ज्यांच्यासाठी कृष्णा पाटील यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला, त्या राम एगडे यांनी दोन जागा मागितल्या आहेत. पूजा वाघ दोन, प्राजक्ता खाडे दोन, सुभाष वाव्हळ दोन, दशरथ पालांडे दोन, एकता भोईर यांनी दोन जागी, कांशीराम राऊत दोन जागेवर, सुशीला यादव दोन, बालाजी काकडे दोन, मीनाक्षी शिंदे दोन, अनिता बिर्जे दोन जागी, संभाजी पंडित दोन, बिंदू मढवी दोन अशा पद्धतीने या नगरसेवकांनी आपल्या घरात तिकिटे मागितली आहेत.

Web Title: The curse of the dynasty of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.