रविवारी ठाण्यात कर्फ्यू
By Admin | Updated: November 14, 2016 04:20 IST2016-11-14T04:20:22+5:302016-11-14T04:20:22+5:30
रविवारची सायंकाळ म्हणजे गजबजाट, गोंगाट, किलबिलाट... मात्र, आजचा रविवार म्हणजे जणू शहरात कर्फ्यू लागला आहे की काय, असे वाटावे

रविवारी ठाण्यात कर्फ्यू
ठाणे : रविवारची सायंकाळ म्हणजे गजबजाट, गोंगाट, किलबिलाट... मात्र, आजचा रविवार म्हणजे जणू शहरात कर्फ्यू लागला आहे की काय, असे वाटावे, इतकी रस्त्यांवर सामसूम होती. अर्थात, त्याचे कारण खिशात ‘नोटपाणी’ नाही हेच होते.
रविवारी पाचपाखाडीच्या खाऊगल्लीतील पिझ्झावर उड्या पडत असतात. पिझ्झासोबत आइस्क्रीम केक असेल तर वॉव. पण, रविवारी तेथे सामसूम होती. गडकरी रंगायतनच्या कॅन्टीनमध्ये हौशी कलाकार, रसिक यांचा राबता असतो. तेथील बटाटावड्याचा घास घेत आणि मिसळपावचा आस्वाद घेत गप्पांचे फड रंगतात. तेथे तुरळक लोक दिसत होते. राममारुती रोडवरील चाटविक्रेते आणि तलावपाळीचे पावभाजीविक्रेते ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. मामलेदारच्या मिसळीच्या झटक्याची केवळ आठवण झाली तरी जिभेला पाणी सुटत होतं. पण, खिशातील नोटांची टंचाई मनाला भिववत असल्याने मिसळीचा मोह अनेकांनी टाळला होता. विकास कॉम्प्लेक्स, हिरानंदानी मेडोज हे परिसरही शांत होते.
विवियाना, कोरम, हायपरसिटी, सिनेवंडर, बिग बाजार, स्टार बाजार येथे रविवारी वाणसामानाच्या, भाजीपाल्याच्या ट्रॉली गच्च भरून ठाणेकर इकडून तिकडे फिरत असतात. तेथे कार्डावर व्यवहार होत असल्याने लोकांची उपस्थिती होती. मात्र, नेहमीसारखी हाउसफुल गर्दी तेथेही नव्हती. गरमागरम कॉफीचे घुटके घेत बसलेली युगुले किंवा यंगस्टर्सचे ग्रुप हे कॉफी जॉइंटपाशी दिसत नव्हते. (प्रतिनिधी)