एक आठवड्यानंतर सुरू झालेल्या लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:32+5:302021-07-27T04:41:32+5:30
ठाणे : तब्बल एक आठवड्यानंतर ठाण्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सोमवारी सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यातील ...

एक आठवड्यानंतर सुरू झालेल्या लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
ठाणे : तब्बल एक आठवड्यानंतर ठाण्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सोमवारी सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर गर्दी झाली होती. पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मागील महिनाभराचा आढावा घेता, शहरातील शासकीय यंत्रणेपेक्षा खासगी रुग्णालयांतून जास्त लसीकरण झाले आहे. यासाठी शासकीय यंत्रणेने पावसाचे कारण दिले असले तरी खासगी रुग्णालयांमध्ये याच काळात लसीकरण जोमाने सुरू होते.
ठाणे महापालिका हद्दीत मागील आठवड्यापर्यंत ७ लाख ३ हजार ९४९ जणांचे लसीकरण झाले होते. संपूर्ण महिनाभराचा विचार केल्यास ठाण्यात जुलै महिन्यात शासकीय यंत्रणेच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये जास्त लसीकरण अधिकचे झाल्याचे दिसते. मागील महिनाभरात पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर सुमारे ६४ हजार जणांना लस देण्यात आली. याच कालावधीत खासगी लसीकरण केंद्रांवर ७३ हजाराहून अधिक नागरिकांनी लस घेतली. जुलै महिन्यात शासकीय केंद्रांवरील लसीकरण मोहिमेला काहीसा ब्रेक लागला होता. मागील महिनाभरात शासकीय केंद्रांवर आठवड्यातून दोन ते तीन दिवस लसीकरण सुरू होते. परंतु खासगी केंद्रांवर रोज लसीकरण सुरू आहे. ठाणेकर नागरिकदेखील आता शासकीय यंत्रणांकडे असलेल्या लसींच्या तुटवड्याला कंटाळले आहेत. तासनतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने ठाणेकरांनी आता खासगी लसीकरणाला प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, सोमवारी महापालिकेच्या ५८ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. प्रत्येक केंद्रावर १०० ते २०० जणांना लस दिली. यामध्ये कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात होता. लस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचे होत्या. गर्दीमुळे अनेक ठिकाणी गोंधळ झाला होता.
आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण लसीकरण - ७ लाख ३ हजार ९४९
पहिला डोस - ४ लाख ६९ हजार ८१३
दुसरा डोस - २ लाख ३४ हजार १३६