कल्याणमध्ये सराईत गुन्हेगार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:22+5:302021-04-30T04:51:22+5:30
कल्याण : हत्येचा कट आणि हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी रहमत युसूफ पठाण याला महात्मा फुले ...

कल्याणमध्ये सराईत गुन्हेगार गजाआड
कल्याण : हत्येचा कट आणि हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी रहमत युसूफ पठाण याला महात्मा फुले चौक पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याच्या घरातून चार लाख पाच हजार रुपये किमतीचा साडेसत्तावीस किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पठाण विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, सहा महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पठाण हा वल्लीपीर चौकीसमोरील त्याच्या घराजवळ आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळाली. त्यानुसार सरोदे यांनी प्रकाश पाटील आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह त्याच्या घराला घेराव घालत शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास थरारकरित्या ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे साडेसत्तावीस किलो गांजा आढळला. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पठाण कोरोना पॉझिटिव्ह
पठाणची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला उपचारार्थ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनातून बरा झाल्यावर त्याचा ताबा महात्मा फुले चौक पोलीस घेणार आहेत.
गंभीर गुन्हे दाखल
पठाणविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हत्येचा कट रचणे, हत्येचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल आहेत. तर, बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल आहे, तर मुंबईतील चेंबूर आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्यात चोरी आणि अमलीपदार्थ बाळगणे आदी गुन्हे पठाणवर दाखल आहेत.
------------