बैलगाडी शर्यतप्रकरणी सेना नगरसेवकावर गुन्हा
By Admin | Updated: June 16, 2016 01:00 IST2016-06-16T01:00:45+5:302016-06-16T01:00:45+5:30
एरंजाड गावात बेकायदा भरवण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत गोळीबार झाल्याने झोप उडालेल्या पोलिसांनी शर्यत आयोजित केल्याबद्दल सेना नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे.

बैलगाडी शर्यतप्रकरणी सेना नगरसेवकावर गुन्हा
बदलापूर : एरंजाड गावात बेकायदा भरवण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत गोळीबार झाल्याने झोप उडालेल्या पोलिसांनी शर्यत आयोजित केल्याबद्दल सेना नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे.
गोळीबार करणाऱ्यांनाही आधीच अटक झाली आहे. या शर्यतीकडे दुर्लक्ष करून तिला छुपा पाठिंबा देणाऱ्या बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरण शमवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा आभास निर्माण करत आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याची धडपड सुरू केल्याचे उघड झाले.
एरंजाड गावात रविवारी बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या. तेथे वादातून एका गटाने दुसऱ्यावर दहशतीसाठी गोळीबार केला होता. गोळीबारामुळे शर्यत प्रकरण चर्चेत आले. बंदी असून शर्यती झाल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित झाला. ज्या गटाने गोळीबार केला होता, त्यातील सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. गोळीबाराचा तपास एकीकडे सुरू असताना दुसरीकडे पोलिसांनी या शर्यती भरवणाऱ्यांचा शोध सुरू केल्याचा भास निर्माण केला. (प्रतिनिधी)
इतरांवर गुन्हे दाखल पण मग पोलिसांचे काय?
शर्यती भरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले असले, तरी या प्रकरणाचा तपास ज्या पोलीस ठाण्यात सुरू आहे, त्याच पोलीस ठाण्याचे अधिकारीही या शर्यतीचे भागीदार आहेत. तेथील पोलिसांच्या सहकार्याने आणि आशीर्वादानेच या स्पर्धा भरवल्या जातात.
अनेक महिने हा प्रकार सुरू आहे. असे असतानाही पोलीस ठाण्यातील जबाबदार पोलिसांवर मात्र कोणतीच कारवाई झालेली नाही किंवा त्यांची चौकशीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणातून वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न पोलीस करीत असल्याचे दिसते.