क्रिकेट सट्टा प्रकरणात बोरीवलीच्या बुकीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 06:27 IST2018-06-28T06:27:51+5:302018-06-28T06:27:54+5:30
क्रिकेट सट्टा प्रकरणात बोरीवली येथील बिपीन वेलजी शहा उर्फ इंद्रप्रस्थ या बुकीस ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली

क्रिकेट सट्टा प्रकरणात बोरीवलीच्या बुकीस अटक
ठाणे : क्रिकेट सट्टा प्रकरणात बोरीवली येथील बिपीन वेलजी शहा उर्फ इंद्रप्रस्थ या बुकीस ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. या प्रकरणात अटक केलेला हा नववा आरोपी आहे.
क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळणाऱ्या आठ आरोपींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा या प्रकरणामध्ये सहभाग उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वयेही कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान हा या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असून, तो ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
बोरीवली येथील बुकी बिपीन याच्या या गुन्ह्यातील सहभागाची माहिती पोलिसांना इतर आरोपींच्या जबाबातून मिळाली होती. त्यामुळे पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर होती. बुधवारी त्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके आणि प्रशांत भुरके यांच्या पकाने बिपीनला बोरीवलीतून अटक केली.
क्रिकेट सट्ट्यामध्ये प्रचंड मोठी उलाढाल असते. लाखो-कोटी रुपयांमध्ये रोजची उलाढाल असते. अशा परिस्थितीत तोटा झाल्यास तो जास्त होऊ नये, यासाठी बुकी त्यांच्याकडे आलेल्या सट्ट्याच्या विशिष्ठ वाटा दुसºया बुकीकडे उतरवितात. त्यामुळे नफा आणि तोटाही विभागला जातो. या व्यवहारासाठी बिपीन इंद्रप्रस्थच्या संपर्कात ४0 बुकी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. सध्या पोलीस कोठडीत असलेला आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान हा मालाड येथील, तर बिपीन इंद्रप्रस्थ हा बोरीवलीचा रहिवासी आहे. दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. जालानच्या टोळीतील बिपीन हा एक महत्त्वाचा बुकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.