कोविड केअर सेंटर सेवेसाठी पुन्हा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:03+5:302021-04-19T04:37:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग फोफावला असताना नागरिकांना उपचार व अलगीकरणासाठी महत्त्वाची ठरलेली मीरा- भाईंदर ...

कोविड केअर सेंटर सेवेसाठी पुन्हा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग फोफावला असताना नागरिकांना उपचार व अलगीकरणासाठी महत्त्वाची ठरलेली मीरा- भाईंदर महापालिकेची काही केंद्र पुन्हा सेवेत दाखल झाली आहेत. तर काही केंद्र आवश्यकता वाटल्यास पुन्हा सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्यावेळी आपत्कालीन स्थितीत लागणारे साहित्य मात्र बऱ्याच प्रमाणात गायब झाले किंवा धूळखात पडले आहे. तर भाड्याने घेतले होते ते परत केले.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला असताना महापालिकेने रामदेव पार्क, न्यू गोल्डन नेस्ट, डेल्टा गार्डन, एस के हाईट्स येथील एमएमआरडीए योजनेतील सदनिकांचा वापर लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांना तसेच संपर्कातील लोकांना अलगीकरणात ठेवण्यासाठी म्हणून उपयोगात आणले. त्यासाठी पालिकेने मिळेल त्या भावाने साहित्य खरेदी तर भाड्यानेही साहित्य घेतले. त्यासाठी काही कोटींचा खर्च झाला. परंतु, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर या इमारतीतील कोविड केअर व अलगीकरण बंद करण्यात आले. या ठिकाणी खरेदी केलेले साहित्य तसेच देणगी स्वरूपात मिळालेल्या वस्तूंपैकी अनेक वस्तू गहाळ झाल्याचे समजते. तर शिल्लक वस्तू धूळखात आहेत. सुरुवातीला भाड्याने बेड, गाद्या आदी घेतले होते. नंतर तेच विकत घेण्यात आले. त्याचीही दुरवस्था झाली आहे.
आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पालिकेने या इमारतींची सफाई व आवश्यक त्या वस्तू घेण्याची तयारी चालविली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास त्यांना ठेवण्यासाठी पालिकेकडे हे चांगले पर्याय आहेत. यातील रामदेव पार्कमधील समृद्धी कोविड केअर सुरू करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे मैदानात कोट्यवधी रुपये देऊन जम्बो कोविड केअर कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सुरू करण्यात आले. त्यावर नाहक काही कोटी खर्च झाले. आणखी खर्च नको म्हणून ते काढून टाकण्यात आले. पालिकेचा नाहक खर्च त्यात वाया गेला. आपत्कालीन स्थितीत सुविधा व साहित्य उभारणे हे जिकिरीचे झाले होते. ही वस्तुस्थिती असली तरी महापालिकेची काही गणिते चुकल्याने खर्च वाढला हेही तितकेच खरे आहे.
प्रमोद महाजन सभागृह, मीनाताई ठाकरे सभागृह व आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात पालिकेने कोविड उपचार केंद्र सुरू केल्याने त्याचा मोठा फायदा झाला. ही उपचार केंद्र कंत्राटी स्वरूपात दिल्याने कोविडची साथ कमी झाली असता ती बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा संसर्ग वाढल्याने उपचारासाठी सुरु केल्याने त्याचाही मोठा दिलासा कोरोना रुग्णांना मिळाला आहे.