छताचे प्लास्टर पडून दाम्पत्य जखमी; राबोडीतील घटना
By अजित मांडके | Updated: November 6, 2024 15:27 IST2024-11-06T15:22:51+5:302024-11-06T15:27:55+5:30
झाकीर यांच्या उजव्या पायाला व दोन्ही हाताला आणि हिना यांच्या चेहऱ्याला व पाठीला दुखापत झाल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

छताचे प्लास्टर पडून दाम्पत्य जखमी; राबोडीतील घटना
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राबोडी नंबर ०२, या ठिकाणी असलेल्या हूमा अपार्टमेंट या इमारतीच्या ०२ ऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ०९ मधील बेडरूमच्या छताचे प्लास्टरचा काही भाग पडल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये झाकीर हुसेन सलमानी (४२) आणि त्यांची पत्नी हिना (३८) हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. झाकीर यांच्या उजव्या पायाला व दोन्ही हाताला आणि हिना यांच्या चेहऱ्याला व पाठीला दुखापत झाल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
राबोडी दोन येथे तळ अधिक ४ मजली इमारत आहे. या ३५ वर्षे जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर ९ हा आबिदा वायदा शेख यांच्या मालकीचा आहे. तेथे सद्यस्थितीत जखमी झाकीर हे कुटुंबास वास्तव्यास आहेत. त्याच रूममधील बेडरूमच्या छताचे प्लास्टरचा काही भाग बुधवारी सकाळी पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा उपअभियंता-सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी (उथळसर प्रभाग समिती), अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (उथळसर प्रभाग समिती) यांनी धाव घेतली. या घटनेत झाकीर आणि त्यांची पत्नी हिना असे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.