नागरी समस्यांसाठी नगरसेविकेचे उपोषण
By Admin | Updated: March 21, 2017 01:47 IST2017-03-21T01:47:04+5:302017-03-21T01:47:04+5:30
शिवसेनेच्या प्रभाग क्र.१३ मधील नगरसेविका तारा घरत यांनी प्रभागातील विविध नागरी समस्यांच्या निवारणासाठी सोमवारी

नागरी समस्यांसाठी नगरसेविकेचे उपोषण
भार्इंदर : शिवसेनेच्या प्रभाग क्र.१३ मधील नगरसेविका तारा घरत यांनी प्रभागातील विविध नागरी समस्यांच्या निवारणासाठी सोमवारी आयुक्त दालनाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.
मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत आझादनगर या आरक्षण क्र. १२२ जागेत बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत औद्योगिक वसाहती व झोपड्या आहेत. त्यांना हटवल्याखेरीज तेथे स्मारकासाठी जागा उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे अनेक महिन्यांपासून बासनात गुंडाळून ठेवलेली तोड कारवाई त्वरित सुरू करून ती जागा स्मारक उभारणीसाठी मोकळी करावी.
गोडदेव येथील नागरी सुविधा भूखंडावरील स्मशानभूमीचे अनेक महिन्यांपासून आधुनिकीकरण सुरू आहे. ते अद्याप पूर्णावस्थेत आले नसल्याने नागरिकांना अंत्यविधीत अडचण होते आहे. तसेच प्रभाग क्र. १३ मधील अंतर्गत वाहतूक रस्त्यांवर अतिक्रमणे वसली आहेत. त्यावर प्रशासन उदासीन असल्याने अतिक्रमणे वाढत आहेत. गोल्डन नेस्ट सर्कल ते क्रीडासंकुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे पादचारी व वाहनांना तेथून येजा करणे त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याचे लवकरात लवकर काँक्रिटीकरण करावे. प्रभागातील क्रीडा संकूल सुरू करावे, यासाठी देखील त्यांनी आवाज उठवला होता.
प्रभागातल्या या नागरी समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत असूनही प्रशासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर नाइलाजास्तव उपोषण करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रशासनाने स्मशानभूमीचे काम ३० मार्चपर्यंत पूर्ण करू, असे लेखी आश्वासन घरत यांना दिले. इतर नागरी समस्यांबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यानेच त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. घरत यांच्या उपोषणाला सेनेच्या सर्व नगरसेविका तसेच नगरसेवकांनी पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)