भिवंडी महासभेत पाणी पेटले ड्रेनेजवरून नगरसेवकांचा विरोध
By Admin | Updated: September 30, 2015 00:04 IST2015-09-30T00:04:48+5:302015-09-30T00:04:48+5:30
महानगरपालिका क्षेत्रात सणांच्या काळात वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याचा आरोप करून नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत प्रशासनास धारेवर धरले

भिवंडी महासभेत पाणी पेटले ड्रेनेजवरून नगरसेवकांचा विरोध
भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रात सणांच्या काळात वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याचा आरोप करून नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत प्रशासनास धारेवर धरले. तर सायंकाळी सभा संपताना केलेल्या ड्रेनेजच्या विषयास नगरसेवकांनी हरकत घेऊन मंचाकडे धाव घेतली. दुपारी १२ वाजता सुरू झालेली महासभा जेवणाची सुट्टी वगळता सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालली.
मनपा उपायुक्त विजया कंठे यांच्या विरोधातील ठराव व स्थायी समितीच्या सदस्यांची निवड या दोन विषयांकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष होते. त्यासाठी नागरिकांनी कार्यालयाच्या परिसरांत गर्दी केली होती. परंतु, महापौरांनी हे दोन्ही विषय आयत्यावेळी तहकूब केले. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पाण्यावर दीड तास तास चर्चा सुरू होती. दरम्यान, स्थायी समिंती सदस्य सुभाष माने यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी संजय म्हात्रे यांची निवड केल्याचे महापौर तुषार चौधरी यांनी जाहिर केले. मनपा आयुक्त व शिवसेना गटनेता दिलीप गुळवी यांनी यांनी केलेल्या चर्चेनुसार ही घोषणा केल्याचे महापौरांनी जाहिर केले. मात्र त्यांनी स्थायी समितीच्या सात सदस्यांच्या निवडीचा विषय आयत्यावेळी तहकूब केला. नगरसेवक विलास पाटील यांनी केंदाकडून रस्त्यासाठी मिळणाऱ्या निधीसाठी ठराव करण्याची सुचना केली असता आयुक्तांनी अंजूरफाटा ते वंजारपाटी नाका रस्त्यासाठी ६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव सभागृहापुढे सादर केला. महापौरांनी केंद्राच्या नगरोत्थान योजनेतून ड्रेनेज स्किमसाठी ७० टक्के राष्ट्रीय अनुदान मिळविण्याचा ठराव घेतला असता तो घेऊ नये यासाठी नगरसेवकांनी महापौराच्या मंचापर्यंत धाव घेतली. त्यामुळे महासभा गाजल्याची चर्चा मनपा वर्तुळात होती.