Coronavirus: वीज ग्राहकांकडून ‘महावितरण’ची सावकारी वसुली; सर्वसामान्यांना बसला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:53 AM2020-06-28T01:53:52+5:302020-06-28T08:23:06+5:30

तिप्पट, चौपट रकमेच्या बिलांमुळे जिल्ह्यात सर्वत्र आक्रोश

Coronavirus: Recovery of loan from MSEDCL from electricity customers; Everyone was shocked | Coronavirus: वीज ग्राहकांकडून ‘महावितरण’ची सावकारी वसुली; सर्वसामान्यांना बसला शॉक

Coronavirus: वीज ग्राहकांकडून ‘महावितरण’ची सावकारी वसुली; सर्वसामान्यांना बसला शॉक

googlenewsNext

ठाणे : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांच्या पगारात मोठी कपात झाली आहे. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्वातून सावरत असतानाच ‘महावितरण’ने ग्राहकांना भरमसाट रकमेची बिले पाठवून शॉक दिला आहे. राज्य सरकार बँका, शाळा, महाविद्यालये आदींसह इतर संस्थांना पुढील किमान तीन महिने कोणत्याही प्रकारची व्याज अथवा फी आकारणी करु नका, असे सांगत असताना सरकारी कंपनी असलेल्या ‘महावितरण’कडून सावकारी वसुली का सुरु आहे, असा सवाल संतप्त वीज ग्राहकांनी केला आहे.

ठाण्यासह संपूर्ण महाराष्टÑात सध्या महावितरणच्या वाढीव बिलांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. घरी नसूनही विजेचे बिल एवढे आलेच कसे, सरासरी बिल भरले असतांनाही आता एवढे बिल कसे, वीजदरवाढ झाली तरी एवढे बिल येऊच कसे शकते, अशा तक्रारी नागरिकांकडून सुरु झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोनामुळे संपूर्णपणे लॉकडाऊन सुरु होता. तो जून महिन्यात काहीसा शिथिल करण्यात आला. या तीन महिन्यांच्या काळात सर्वसामान्यांनी रोजगार गमावले आहेत. काहींच्या पगारात कपात झाली आहे. अनेकांच्या डोक्यावर विविध प्रकारची कर्ज आहेत. ती कशी फेडायची, याची चिंता त्यांना सतावत असतांना जून महिन्यात आलेल्या बिलांमुळे सर्वांचीच झोप उडाली आहे.

ज्या ग्राहकाला महिन्याचे १,५०० रुपयांच्या आसपास बिल येत होते, त्यांना आता पाच हजारांच्या घरात बिले धाडली आहेत. ज्या घरात वीज वापर जास्त असल्याने पाच हजारांचे बिल येत होते, त्यांना चक्क १५ हजारांचे बिल आले आहे. काही उद्योजक , व्यापारी यांना १५ ते २५ लाखांची बिले आली आहेत.

अनेकांची दुकाने, कारखाने लॉकडाऊनमुळे बंद होती. कामगारांना घरी बसून त्यांनी वेतन दिले. त्यात आता अचानक मोठमोठ्या रकमेची बिले आल्याने उद्योजक, व्यापारी हबकले आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली व इतर भागातही महावितरणविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत.

या संदर्भात ‘महावितरण’च्या तज्ज्ञ अभ्यासकांना विचारले असता, नागरिकांना आलेले बिल हे नियमानुसारच आले असल्याचे त्यांनी सांगितले. घरगुती विजेचा वापर वाढला असून सरासरी बिल आकारतांना ते नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यानुसार आकारण्यात आले आहे. परंतु, त्यामुळे ते कमी दिसत आहे, वास्तविक मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा जास्त होता. सर्वचजण घरी होते, त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे, तसेच वीजदरात वाढ झाल्याने हे बिल ग्राहकांना आले आहे. परंतु, एखाद्या प्रकरणात कोणाला जास्त बिल दिले गेले असेल, तर त्यासाठी दाद मागण्याची व्यवस्था ‘महावितरण’ने उपलब्ध केली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘महावितरण’कडून नियमानुसारच बिलांची आकारणी झालेली आहे. यापूर्वी जेव्हा संपूर्ण उद्योग, व्यवसाय सुरु होते, त्यावेळेस २१ हजार मेगावॅट युनिट विजेचा वापर होता. तर, लॉकडाऊनच्या काळात व्यापार, उद्योग बंद असतानाही वीजवापर कमी झालेला नाही, तो १४ हजार मेगावॅटपर्यंत झाला आहे. त्यामुळे निश्चितच घरगुती विजेचा वापर या काळात वाढला आहे. ज्यांना वाटत असेल की, आम्हाला जास्त रकमेची बिले आली आहेत, त्यांच्यासाठी एक लिंक महावितरणने देऊ केली आहे, त्यावर ते आपल्या बिलाची खातरजमा करूशकतात.
- अनिल कांबळे, मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी, महावितरण

‘महावितरण’कडून नियमानुसारच बिलांची आकारणी झालेली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये विजेचा वापर निश्चितच वाढला आहे. त्यामुळे आलेले बिल हे योग्य आहे. त्यामुळे वाढीव पैसे ग्राहकांना भरावेच लागणार आहेत. दोन कोटी ८० लाख लोकांना ‘महावितरण’ फसवत नाही. चूक झाली नसेल असे माझे म्हणणे नाही. परंतु, यातून कोणाला दोष देणे योग्य नाही. १०० युनिट ऐवजी २५० युनिट कसे वाढले, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्याचे उत्तर वापर वाढला हेच आहे. - अशोक पेंडसे, वीजविषयक अभ्यासक

Web Title: Coronavirus: Recovery of loan from MSEDCL from electricity customers; Everyone was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.