CoronaVirus News : तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकला, जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 23:31 IST2021-04-13T23:30:49+5:302021-04-13T23:31:26+5:30
CoronaVirus News: कोविड रुग्णांवर मुख्यत्वे शासकीय रुग्णालय, संलग्न रुग्णालये व महानगरपालिका रुग्णालयांतून उपचार करण्यात येत आहेत.

CoronaVirus News : तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकला, जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांचे आवाहन
पालघर : सद्यस्थितीत राज्यात कोरोनाने बाधित रुग्ण आढळत असल्याने कोविड रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
कोविड रुग्णांवर मुख्यत्वे शासकीय रुग्णालय, संलग्न रुग्णालये व महानगरपालिका रुग्णालयांतून उपचार करण्यात येत आहेत. तथापि, दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड-१९ बाधित रुग्णांच्या उपचारासाठी खाटा कमी पडू नयेत, यासाठी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या सूचनांमध्ये रुग्णालयांनी तातडी नसलेल्या सर्व नॉन कोविड शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात, रुग्णालयात पुरेसा मास्क, ग्लोज, पर्सनल प्रोटेक्शन किट व आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. ज्या नॉन कोविड रुग्णांच्या बाबतीत परिस्थितीत पूर्णत: नियंत्रणाखाली आहे, अशांना घरी सोडावे, आदींचा समावेश आहे.
कडक नियम पाळावेत
ज्यांना बाह्यरुग्णसेवा देणे शक्य आहे, अशांना घरी सोडण्यात यावे. अशा प्रकारचे नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, नॉनकोविड आंतररुग्ण असलेल्या रुग्णाजवळ केवळ एकाच नातेवाईकास थांबण्याची परवानगी देण्यात यावी. रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना शिंकणे, खोकणे याबाबतचे नियम पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.