CoronaVirus News: कोरोनाच्या प्रादुर्भावात ‘नाका कामगार’ देशोधडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 02:05 IST2021-04-05T02:05:18+5:302021-04-05T02:05:35+5:30

कल्याण-डोंबिवली शहरांचा विचार करता आजमितीला नाका कामगारांची संख्या २० हजारांहून अधिक आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हाताला काम न राहिल्याने जगायचे कसे? असा यक्षप्रश्न हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबापुढे उभा राहिला.

CoronaVirus News: 'Naka Kamgar' goes missing due to corona outbreak | CoronaVirus News: कोरोनाच्या प्रादुर्भावात ‘नाका कामगार’ देशोधडीला

CoronaVirus News: कोरोनाच्या प्रादुर्भावात ‘नाका कामगार’ देशोधडीला

- प्रशांत माने

कल्याण : नोटबंदी, जीएसटी, रेरा कायदा, जागतिक मंदीच्या फेऱ्यात बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या सावटात या क्षेत्राशी निगडित नाका कामगारांच्या हाताला काम राहिलेले नाही. आता पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने हातावर पोट असलेल्या या कामगारांनी गावाकडे धाव घ्यायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे वारंवार स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर येत असल्याने हा कामगार देशोधडीला लागल्याचे चित्र दिसत आहे. 

कल्याण-डोंबिवली शहरांचा विचार करता आजमितीला नाका कामगारांची संख्या २० हजारांहून अधिक आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हाताला काम न राहिल्याने जगायचे कसे? असा यक्षप्रश्न हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबापुढे उभा राहिला. त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानही झाले. २५ ते ३० वर्षे शहरात वास्तव्याला असलेला हा कामगार हाताला काम मिळत नसल्याने गावाकडे स्थलांतरित झाला होता. केडीएमसीच्या शाळांतील बहुतांश विद्यार्थी ही मजुरांची मुले असल्याने त्यांच्या स्थलांतराचा फटका पटसंख्येलाही बसला. अनलॉकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आणि गावाकडे गेलेला कामगार पुन्हा शहराकडे दाखल झाला. काहींनी मात्र गावाला राहणे पसंत केल्याने गावाकडून शहराकडे थोड्या संख्येने उपलब्ध झालेल्या नाका कामगाराला चांगली मजुरी मिळत गेली. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मजूर पुन्हा चिंतातूर झाले आहेत.

२५ टक्के कामगारांचे अगाेदरच स्थलांतरण
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा कामगारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. मागील लॉकडाऊनमध्ये अनेकांना पायपीट करीत गाव गाठावे लागले होते. त्यामुळे आता लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २५ टक्के कामगार स्थलांतरित झाले आहेत.  

Web Title: CoronaVirus News: 'Naka Kamgar' goes missing due to corona outbreak