CoronaVirus News: गणेशोत्सवात दानपेटी नव्हे, मास्क, सॅनिटायझरपेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:41 IST2020-08-09T00:41:47+5:302020-08-09T00:41:55+5:30
‘विघ्नहर्ता’चा उपक्रम; गरिबांना वाटणार

CoronaVirus News: गणेशोत्सवात दानपेटी नव्हे, मास्क, सॅनिटायझरपेटी
ठाणे : जगभर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे ठाण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी अभिनव निर्णय घेतले आहेत. यात यंदा दानपेटी नव्हे, तर मास्क आणि सॅनिटायझरपेटी ठेवण्याचा निर्णय वागळेच्या विघ्नहर्ता या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
कोरोना अद्याप आटोक्यात आला नसल्याने गणेशोत्सवावरदेखील यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. त्या धर्तीवर महापालिकेने आपली नियमावली जाहीर करून गणेशोत्सव साजरा करण्याचे सूचित केले आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी गणेशभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंडळांनीदेखील त्यांच्या पातळीवर उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. हॉटस्पॉट अथवा कंटेनमेंट झोनमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १० दिवसांचा गणेशोत्सव हा दीड दिवसावर आणला आहे.
ठाणे शहरात मागील ३० वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या वागळेच्या विघ्नहर्ता या मंडळाने दानपेटीपेक्षा मास्क आणि सॅनिटायझरपेटी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पेटीत भक्तांना मास्क आणि सॅनिटायझरदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पेटीत जमा होणारे हे मास्क आणि सॅनिटायझर हे रस्त्यावर राहणाºया गोरगरिबांना वाटप करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले.
रस्त्यावर अनेक गोरगरीब लोक राहतात. ज्यांना या कोरोनामुळे एकवेळचे अन्न मिळेनासे झाले आहे, त्यांना मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करणे अशक्य असते. त्यामुळे ते विनामास्कचे फिरत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांना हे वाटप केले जाणार आहे.
यंदा आरोग्य उत्सव
मंडळ यंदाचे वर्ष हे आरोग्य उत्सव म्हणून साजरे करणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यात रक्तदान शिबिर, आरोग्यतपासणी आणि अवयवदान हे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहे. तसेच यंदा वर्गणी न घेता पदाधिकाऱ्यांकडून निधी गोळा करून यंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे.