CoronaVirus News: फेरीवाल्यांची गर्दी देते कोरोनास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:59 IST2021-04-06T00:59:22+5:302021-04-06T00:59:40+5:30
मीरा-भाईंदरमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर : तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

CoronaVirus News: फेरीवाल्यांची गर्दी देते कोरोनास निमंत्रण
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून, त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात महापालिका, पोलिसांसह स्थानिक नगरसेवक अपयशी ठरले आहेत. फेरीवाल्यांचे बाजार, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील गर्दी कोरोना संसर्गवाढीला मोठे कारण मानले जात असतानादेखील अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने ठोस कारवाई केली जात नाही.
मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांवर मोठे अर्थचक्र चालत असते. जेवढे फेरीवाले तेवढे बाजार वसुली करणाऱ्या ठेकेदारांचे उखळ पांढरे होते. शिवाय पालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवक-राजकारण्यांचे अर्थपूर्ण लागेबांधेही ते वाढवण्यास कारणीभूत ठरले आहेत.
फेरीवाल्यांविरोधात आधी बोंब करायची मग वजन वाढवून चिडीचूप व्हायचे, असा नगरसेवकांचा किस्सासुद्धा चर्चेत आहे. फेरीवाल्यांच्या हातगाड्यासुद्धा भाड्याने देणारी टोळी आहे. साहजिकच प्रचंड आर्थिक फायद्याच्या या घटकाकडे चराऊ कुरण म्हणून पहिले जात असल्याने शहरात त्यांचे साम्राज्य पसरले आहे.
रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर तर शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रुग्णालय परिसरात १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. परंतु, तेथे सर्रास फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे. ना फेरीवाला क्षेत्रात तर फलकांखालीच महापालिकेच्या नाकावर टिच्चून फेरीवाले बसत आहेत. वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा गंभीर झाला असताना फेरीवाल्यांनाच पाठीशी घातले जाते.
कोरोनाचा संसर्ग एकीकडे पसरत असताना बहुतांश फेरीवाले हे मास्क न घालताच असतात. अनेक जण नाका-तोंडा खाली मास्क ठेवतात. त्यांच्याकडे सॅनिटायझर नसते. फेरीवाल्यांच्या ठिकाणी सतत लोकांची गर्दी होत असते. मास्क न घालणाऱ्या ग्राहकांनासुद्धा ते रोखत नाहीत. रस्ते-पदपथांवर बसणारे फेरीवाल्यांच्या भाजी व अन्य विक्रेत्यांकडे जशी गर्दी असते तशीच गर्दी खाद्यपदार्थ विक्रेत्या हातगाड्यांवर दिसते.
कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन
शहरात बेकायदेशीर आठवडे बाजारसुद्धा जोरात चालतात. भाईंदर रेल्वेस्थानकाजवळ भल्या पहाटे भरणारा मासळी बाजार असो की डॉ. आंबेडकर ६० फुटी मार्ग, भाईंदर पूर्व खारीगाव, मीरारोड स्थानक येथे पहाटे भरणारा भाजीचा घाऊक बाजार, गर्दीने फुललेला असतो. मास्क न घालणे हे तर नित्याचेच झाले आहे. रहदारी व पादचाऱ्यांना नेहमीच वेठीस धरणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांनी आता कोरोना संसर्ग रोखण्याच्या नियम निर्देशांचेसुद्धा उघडउघड उल्लंघन चालवले आहे.