CoronaVirus News: कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढणार नाही, हे लिहून द्यावे- श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:42 IST2020-08-13T00:42:24+5:302020-08-13T00:42:34+5:30
कोविड सेंटर उभारणे बंद करण्याच्या टीकेला प्रत्युत्तर

CoronaVirus News: कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढणार नाही, हे लिहून द्यावे- श्रीकांत शिंदे
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे मनसे आ. राजू पाटील यांनी लिहून द्यावे. मगच, कोविड सेंटर उभारणे बंद करू, अशा शब्दांत शिवसेना खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाटील यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. दोन्ही शहरांमधील रुग्ण कमी झाले असताना सत्ताधारी केवळ खाटा टाकून कोविड सेंटर उभे करण्याचे काम करीत असल्याची टीका पाटील यांनी केली होती.
शिंदे म्हणाले की, महापालिकेने क्रीडासंकुल आणि पाटीदार भवन येथील कोविड सेंटरमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या जात आहे. कोविड सेंटर उभारली जात नव्हती, तेव्हा याच आमदारांनी सुविधा मिळत नसल्याची ओरड केली होती. आता सुविधा उभारल्या गेल्या, तर रुग्णसंख्या कमी झाल्याने तेथे खाटा टाकण्याचे काम केले जात असल्याची टीका केली आहे. चांगले काम होत असल्यास त्याला चांगले बोलायची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. पत्रीपूल आणि मोठागाव ठाकुर्ली-माणकोली या पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. लॉकडाऊन असतानाही कामाला गती दिली आहे. तरीही कोणी या पुलांच्या कामाला हेरिटेजचा दर्जा द्या, अशी टीका करीत असल्यास विरोधक असल्याने तसे बोलत आहे, असे शिंदे म्हणाले.