CoronaVirus News: उल्हासनगर पालिका हद्दीत कोरोना मृत्युदर सव्वातीन टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:37 AM2020-10-06T00:37:33+5:302020-10-06T00:37:42+5:30

विरोधकांनी प्रशासनाला केले लक्ष्य; चाचण्या कमी होत असल्याचा केला आरोप; सर्वेक्षणाबाबत माहिती नाही

CoronaVirus News: Corona Mortality Rate in Ulhasnagar Municipal Corporation | CoronaVirus News: उल्हासनगर पालिका हद्दीत कोरोना मृत्युदर सव्वातीन टक्के

CoronaVirus News: उल्हासनगर पालिका हद्दीत कोरोना मृत्युदर सव्वातीन टक्के

Next

उल्हासनगर : कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात पुढे असलेल्या महापालिकेचा मृत्युदर ३.२७ टक्के असल्याने सर्वस्तरातून टीका होत आहे. राज्याचा मृत्युदर अडीच टक्के असताना उल्हासनगरातील अधिक मृृत्युदर ही डोकेदुखी ठरली आहे. चाचण्या कमी होत असल्याने मृत्युदराची टक्केवारी जास्त असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम अंतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

उल्हासनगर शेजारील शहरात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना शहरात हातावर मोजण्या इतपत कोरोना रुग्णांची संख्या होती. त्या दरम्यान तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली झाल्यानंतर कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णाच्या संख्येत घट झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. कोरोना रुग्णाची संख्या ९ हजार ४०० पेक्षा जास्त तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के पेक्षा जास्त आहे. एकूण ६१५ कोरोना रुग्णावर उपचार सुरू असून त्यापैकी १७९ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. देश व राज्याचा मृत्युदर अड्डीच टक्के पेक्षा कमी असताना, शहराचा मृत्युदर ३.२७ टक्के आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागासह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सर्वस्तरातून टीका होत आहे.
महापालिकेने कोरोना रुग्णाची संख्या रोखण्यासाठी व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या कामगाराची अ‍ँन्टीजेन व कोरोना चाचणी घेण्यासाठी दुकानात अर्ज दिले होते. मात्र त्यानंतर त्याचे काय झाले, याबाबतची माहिती महापालिका अधिकारी देण्यास तयार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवण्याकरिता १८८ आरोग्य पथकाची स्थापना महापालिकेने केली.

आरोग्य पथक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे. यामध्ये कोरोना संशयित रुग्ण किती? किती नागरिकांचे सर्वेक्षण झाले आदींची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. माहिती मिळताच ती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येणार आहे, असे महापालिका वैद्यकीय अधिकारी पगारे यांनी सांगितले. पालिकेकडे अद्याप सर्वेक्षणाचीच माहिती नसल्यानेही टीका होत आहे.

शहरात सापडले २७ नवे रुग्ण; तर एकाचा उपचारांदरम्यान झाला मृत्यू
उल्हासनगर : पालिका हद्दीत सोमवारी नवे २७ रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ३०९ झाली असून ४७ जणांनी कोरोनावर मात केली.

एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९,४२६ तर एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८,५०२ झाली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१५ आहे.

त्यापैकी महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये २७१, होम आयसोलेशनमध्ये १७९, तर शहराबाहेरील रुग्णालयात १६५ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२० टक्के आहे. कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने चिंता वाढली आहे.

Web Title: CoronaVirus News: Corona Mortality Rate in Ulhasnagar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.